रस्त्यांवर थुंकणार्यांना आता हजार रुपये मोजावे लागणार!
बीड । वार्ताहर
कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी अधिक कठोर उपाययोजना अवलंबल्या आहेत. सोमवारी (दि.13) रात्री उशिरा याबाबत नवा आदेश जारी करण्यात आला आहे. यानुसार आता बीड जिल्ह्यातील नागरिकांनी सार्वजनिकस्थळी चेहर्यावर मास्क न वापरल्यास नाक व तोंड सुरक्षितपणे झाकलेले नसल्यास संबंधितास 500 रुपये दंड आकारला जाणार आहे. शिवाय दुसर्यांदा असा प्रकार झाल्यास संबंधिताविरुध्द फौजदारी कारवाई केली जाणार आहे. याबरोबरच रस्त्यावर थुंकणार्यांकडूनही तब्बल 1 हजार रुपयांचा दंड वसुल केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनो घरी रहा, सुरक्षित राहणे गरजेचे आहे.
सोमवारी रात्री जिल्हाधिकारी यांनी एक विस्तृत आदेश जारी केला आहे. तो पुढीलप्रमाणे:-
*सार्वजनिक स्थळी जसे की, रस्ते, बाजार, रुग्णालय, कार्यालय या ठिकाणच्या परिसरात थुंकणार्यांना 1000 रुपयांचा दंड आकरण्यात येणार आहे. दरम्यान सदर व्यक्ती दुसर्यांदा आढळल्यास फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.
*सार्वजनिक स्थळी चेहर्यावर मास्क न वापरणे, नाक व तोंड सुरक्षितपणे झाकलेले नसणे असा व्यक्ती आढळल्यास त्यास 500 रुपये दंड व दुसर्यांदा आढळल्यास फौजदारी कारवाई केली जाणार आहे.
*दुकानदार, फळे, भाजीपाला विक्रेते व सर्व जीवनावश्यक वस्तू विक्रेते व ग्राहक यांनी सोशल डिस्टसिंग न राखणे, ( 2 ग्राहकामध्ये कमीत कमी 3 फुटाचे अंतर न राखणे, विक्रेत्याने दुकानाबाहेर मार्किंग न करणे) असे आढळून आल्यास ग्राहकास 200 रुपये दंड व दुकानदार, विक्रेत्यास 2000 रुपये दंड केला जाणार आहे. दुसर्यांदा आढळल्यास फौजदारी कारवाई होणार आहे.
*किराणा व जीवनावश्यक वस्तु विक्रेत्यांनी वस्तूंचे दर न लावल्यास 5000 दंड व दुसर्यांदा आढळल्यास फौजदारी कारवाई केली जाणार आहे.
* सार्वजनिक ठिकाणी रस्ते, बाजार, रुग्णालयात एखादी व्यक्तही 18 वर्षापेक्षा कमी व 60 वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीसोबत विनाकारण आढळून आल्यास 1 हजार रुपये दंड, दुसर्यांदा आढळून आल्यास फौजदारी कारवाई केली जाणार आहे.
*दुचाकीवरुन भाजीपाला वाहतूक करु नका*
बीड जिल्ह्यात अनेकदा भाजीपाला खरेदीसाठी दुचाकीचा वापर केला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता यापुढे दुचाकीवरुन भाजीपाला, किराणा इत्यादी सामान घेऊन जाताना कोणी आढळून आल्यास संबंधितास 1 हजार रुपये दंड व दुसर्यांदा आढळून आल्यास फौजदारी कारवाई केली जाणार आहे.
या सर्व कारवाया स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात नगरपालिका, नगरपंचायत व ग्रा.पं.ने करावयाच्या आहेत. या सर्व आदेशाचे उल्लंघन करणार्याला भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षापात्र अपराध केला आहे असे मानण्यात येईल. तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897, महाराष्ट्र कोव्हिड 19 उपाययोजना नियम 2020 अंतर्गत संबंधितांवर कार्यवाही प्रस्तावित करण्यात येणार आहे. शिवाय या कारवाया करताना फोटो आणि चित्रीकरण करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
Leave a comment