परळी । वार्ताहर
आज 14 एप्रिल रोजी सर्वत्र साजरा होणा-या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्याच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे कोणतेही सामूहिक आयोजन न करता सर्वांनी घरच्या घरीच साजरी करावी, तसेच संविधान व समतेचा दिवा लाऊन संविधान रक्षणाचा व देशाचे कर्तव्यदक्ष नागरिक असल्याचा संदेश सर्वांनी जगाला द्यावा असे आवाहन मुंडे यांनी केले आहे.महाराष्ट्रासह जगासमोर उभ्या असलेल्या कोरोनाच्या वैश्विक संकटामुळे राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू आहे, अशावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेल्या संविधानाचा व राज्यघटनेतील नागरिक म्हणून आपल्याला घालून दिलेल्या कर्तव्यांचा सर्वांनी अंमल करून सरकारला सहकार्य करावे असे ना. मुंडे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर -चित्रपटाचा लाभ घ्यावा
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभाग, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ व सामाजिक न्याय विभाग यांच्या वतीने सामाजिक न्याय विभाग भारत सरकार निर्मित डॉ. बाबासाहेब आंबेडकर - द अनटोल्ड ट्रुथ हा चित्रपट मंगळवारी (14 एप्रिल) दुपारी 1.30 वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाचा सर्वांनी आनंद घ्यावा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र प्रत्यक्ष अनुभवावे असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले आहे.
Leave a comment