बीड । वार्ताहर
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी सोमवारी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे संवाद साधून जिल्ह्यातील कोरोना उपाययोजनांबाबत त्यांना सूचना दिल्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार जिल्ह्यातील कोरोना उपाययोजनांबाबत लक्ष देत आहेत. सोमवारी त्यांनी जिल्ह्यातील पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याशी संवाद साधला. ग्रामपंचायत पातळीवर कोरोना उपाययोजनांसाठी सूचवलेली दशसूत्रीची प्रभावी अंमलबजावणी करावी, आरोग्य अधिकार्यांनी तालुक्यातील आरोग्य स्थिती, सर्व्हेक्षण याबाबत लक्ष द्यावे, बालविकास प्रकल्प अधिकार्यांनी अंगणवाडीतील बालकांना पोषण आहार घरपोच मिळतोय का याबाबत लक्ष द्यावे अशा सूचना त्यांनी दिल्या. शिवाय, आवश्यकता असेल तिथे गटविकास अधिकार्यांनी स्वत: भेट द्यावी, उन्हाळ्याच्या अनुषंगाने पाणी टंचाईच्या स्थितीची माहिती घेऊन उपाययोजनांबाबत लक्ष द्यावे अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
Leave a comment