लोकशाहीर अप्पासाहेब उगले यांनी दिला जागरण गोंधळातून संदेश
जालना । वार्ताहर
महाराष्ट्राच्या कुलस्वामिनीच्या नावानं आपण जागरण गोंधळ घालतो. मात्र एकीकडे सत्कर्म करत असतांनाच दुसरीकडे जन्माला येणार्या लेकीला जग पाहण्यापूर्वीच तिची हत्या केली जाते. हे मुळीच बरोबर नाही. याला पुरुषांपेक्षाही महिलाच अधिक जबाबदार आहेत. परंतू लेक ही ब्रम्हामंड नायक आहे, तिला जन्माला येऊ द्या, तिनं कोणतंही पाप केलेलं नाही. ज्याने चोच दिली त्याने दाणाही दिला आहे, असा मर्मजळीत संदेश सुप्रसिध्द लोकशाहीर, लोककलावंत अप्पासाहेब उगले यांनी येथे बोलतांना दिला. मंठा रोडवरील साई हिल्स येथे विष्णू धनेधर यांनी आयोजित केलेल्या जागरण गोंधळ कार्यक्रमात शाहीर उगले बोलत होते.
यावेळी त्यांना भगवान इंगळे, विशाल उगले, ज्ञानेश्वर पवार, रोहीत काटे, सुनिल उगले या कलावंतांनी साथ दिली. आठ महिन्यानंतर आपण हा पहिलाच सार्वजनिक कार्यक्रम करत आहोत, असे सांगून श्री.अप्पासाहेब उगले यांनी जातं आणि आधुनिक ङ्गेसबुक मधला ङ्गरक स्पष्ट करुन सांगतांनाच बहिण- भावाचं नात्याची महती सांगून अत्याधुनिक चालिरितींवर परखड आणि मार्मिक शब्दात भाष्य करुन स्त्री हीच स्त्रीची दुष्मण असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, मुलगी झाली की, लोकं नाकं का मुरडतात, हेच समजत नाही. आई जगदंबेचे आपण भक्त आहोत, ही बाब चांगली असली तरी मुलीची भ्रुण हत्या करुन आपणच जगदंबेचे तळतळाट घेत नाहीत का? खरे तर ज्याने चोच दिली आहे त्यानेच दाण्याचीही व्यवस्था केली आहे. मग भिण्याचे कारण काय? असे सांगून शाहीरांनी आपल्या कलेतून कन्येची महती विषद करुन सांगितली. अधून - मधून ग्रामीण शैलीत मारलेले शालजोडे, हास्य विनोद आणि त्याला लागूनच आई जगदंबेच्या गिताची पेरणी करुन शाहीर अप्पासाहेब उगले यांनी या कार्यक्रमात चांगलीच रंगत आणली. या कार्यक्रमास महिला- युवतींसह साई हिल्स परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment