बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यात शनिवारी (दि.11) 8 तर रविवारी 1 अशा एकुण 9 संशयित रुग्णांच्या घशातील स्त्रावाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. या सर्व रुग्णांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. बीड जिल्ह्यात आजपर्यंत केवळ एक पॉझिटिव्ह सापडला असून तो पण जिल्ह्याबाहेर विलगीकरण कक्षात आहे. शिवाय त्याच्या कुटूंबातील इतर कोणालाही बाधा झाली नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे.
राज्यातील महानगरांमध्ये कोरोनाचा धोका वाढत चालला आहे. बीड जिल्ह्यात सुदैवाने अजुनही ही स्थिती नियंत्रणात आहे. आष्टी तालुक्यातील एका रुग्णाचा अपवाद वगळता कोणीही कुठेही रुग्ण सापडलेला नाही. शनिवारी सकाळी बीड जिल्ह्यातून 8 जणांच्या घशाच्या स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. तर रविवारी (दि.12) गेवराई तालुक्यातील महारटाकळी येथील एका संशयितास दाखल करण्यात आल्यानंतर जिल्हा रुग्णालयातून त्याचे स्वॅबही तपासणीसाठी घेतले गेले होते.दरम्यान सोमवारी सकाळी महारटाकळीच्या संशयिताचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. नंतर सायंकाळी उर्वरित 8 जणांचेही रिपोर्ट औरंगाबादच्या प्रयोगशाळेतून प्राप्त झाले, ते सर्व निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली.बीड जिल्ह्यात सोमवारपर्यंत (दि.13) एकुण 129 जणांचे थ्रोट स्वॅब रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आलेले आहेत. यात जिल्हा सामान्य रुग्णालयातील 96 तर अंबाजोगाईच्या स्वाराती ग्रामीण रुग्णालयात दाखल झालेल्या 33 जणांचा समावेश आहे.
‘तो’ संशयित कोरोना निगेटिव्ह
गेवराई तालुक्यातील महारटाकळी येथील एका संशयिताचा रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आला आहे. सोमवारी (दि.13) सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयाला प्राप्त झाला या संशयिताच्या संपर्कात आलेल्या महार टाकळी व बोधेगाव येथील जवळपास 42 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
105 जण संस्थापक अलगीकरणात
बीड जिल्ह्यात परदेशातून 118 व्यक्ती आल्याची नोंद आरोग्य यंत्रणेकडे आहे. या सर्वांना होम क्वॉरंटाईन केले गेले होते. पैकी 117 जणांचा 14 दिवसांचा क्वॉरंटाईन कालावधी संपलेला आहे. उर्वरित एक जण क्वॉरंटाईन असून बाहेर जिल्ह्यातून आलेले 52 जण होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत. तर 105 व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात ठेवलेले आहेत. सोमवारी 2 जणांना आयसोलेशन करण्यात आले असून आतापर्यंत पाठवलेले सर्व रिपोर्ट जिल्हा रुग्णालय प्रशासनाला प्राप्त झालेले आहेत. सर्व प्राप्त 129 वैद्यकीय अहवाल कोरोना निगेटिव्ह आलेले आहेत.
पाच दिवसांपासून सर्व्हेक्षण सुरु
बीड जिल्ह्यातील एक रुग्ण अहमदनगर जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. तो पिंपळा (ता. आष्टी) येथील असून,या परिसरातील पिंपळा,धनगरवाडी, काकडवाडी, खरडगव्हाण,सुंबेवाडी,नांदूर, लोणी, कोयाळ ,कुंटेफळ (पु),सोलापूरवाडी, ठोंबळसांगवी या गावात मागील पाच दिवसांपासून सर्वेक्षण चालू आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी दिली.
Leave a comment