मुंबई :
कोरोना प्रतिबंधासाठी लोकांनी स्वतःला होम क्वारंटाईन केले असले तरी, भाजी खरेदीसाठी होणारी गर्दी कोरोना संसर्गाला आमंत्रण देणारी ठरत आहे. त्यामुळे महापालिकेने बाजारपेठाच बंद केल्या आहेत, तर काही ठिकाणी वेळेची बंधने घातली आहेत. कोरोना प्रतिबंधासाठी गर्दी टाळणे, सोशल डिस्टनसिंग पाळणे आणि घरी स्वस्थ बसणे हे तीन पर्याय आहेत. इलाज म्हणून लोक नाईलाजाने घरी बसत आहेत. पण लहान घरे, घरी राहण्याचा कंटाळा आणि मजा म्हणून लोक बाहेर पडत असल्याने जमावबंदी आदेशाचे पालन होत नाही. त्यामुळे साहजिकच गर्दी होते. शिवाय पोलिसांचे काम वाढते.
बाजारात सकाळच्या वेळेस भाजी येते. त्यानंतर दिवसभर बाजार सुरूच राहतो, पण ताजी भाजी म्हणून सकाळच्या वेळेस खरेदीसाठी जत्रा फुलते. त्यावेळी सोशल डिस्टनसिंग पाळले जात नाही. ही गर्दीच कोरोनाच्या प्रसाराला मोठे करण ठरत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत असलेल्या ठिकाणी आता भाजीबाजार आणि बाजारपेठांवरच निर्बंध घालण्यात आले आहेत.
जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी कमी होत नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी आता विभागवार बाजारपेठा टप्प्याटप्प्याने बंद करण्याचे धोरण पोलीस आणि पालिका प्रशासनाने अवलंबले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी कमी करण्यासाठी दादर पश्चिम येथील भाज्यांच्या घाऊक बाजाराचे विभाजन करण्यात आले. घाटकोपर, दहिसर, मुलुंड, वांद्रे बिकेसी या ठिकाणी भाजीबाजार सुरू झाले.
मात्र गर्दी कमी होण्याऐवजी वाढतच गेली. त्यामुळे पालिका आयुक्तांनी भाजीपाला आणि फळांचे मार्केट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने होत आहे. एन विभागाच्या ११ प्रभागात फक्त सोमवार/गुरुवार या दोन दिवसातच १० ते ५ या वेळातच सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळत भाजी विक्री होणार आहे. इतर दिवशी बाजार पूर्णपणे बंद राहणार आहे. के/वेस्टमध्ये तर धान्य/कडधान्ये दुकाने आणि औषधाची दुकाने वगळता पुढील आदेश येईपर्यंत बाजारपेठ बंद राहणार आहे. आर/मध्य विभागातील बोरिवली पूर्व/पश्चिम, दहिसर, चारकोप या परिसरात तर अन्नधान्याची दुकाने, औषधी दुकाने वगळता रस्ते, पदपथ अशा ठिकाणी फळ, भाजीविक्रीला पूर्णपणे बंदी घातली आहे.
कंटेन्मेंट असलेल्या परिसरात तर कोणत्याही व्यवसायाला बंदी आहे. तेथे शासनाकडून बाहेरून पुरवठा केला जात आहे. जनतेने निर्बंध सहन केले आणि सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळले तर लॉकडाऊनच्या वाढत्या काळात कोरोना निश्चित हद्दपार होईल, असा विश्वास आता लोकांमधूनच व्यक्त होत आहे.
सोसायट्यांकडून थेट भाजीपाला
भाजीपाल्याच्या बाजारपेठा बंद झाल्यानंतर काही सोसायट्यांनी नियमांच्या अधीन राहून आठवड्यातून एक-दोन दिवस ठराविक वेळेत थेट भाजीपाला मागविण्यास सुरुवात केली आहे. सभासदांचेही त्यांना चांगले सहकार्य मिळत आहे.
13
Apr
Leave a comment