लॉकडाऊनमध्ये अवैध गुटखा पकडला; पाठलाग करुन पकडलेला आरोपीच निघाला हवालदार!
पुणे |
पुण्यात लॉकडाऊनमध्ये अनेक गुन्हे घडत असल्याचं समोर आलं आहे. मृत मनपा कर्मचाऱ्याच्या ड्रेस घालून दोन तरुण गांजा आणायला गेल्याचं उघड झाल्यानंतर, आणखी एक भलताच प्रकार समोर आला आहे. अवैध गुटखा पकडला असता, आरोपी हा चक्क पुणे पोलिसातील हवालदार असल्याचं समोर आलं आहे.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी नाकाबंदीदरम्यान, बेकायदेशीर गुटखा घेऊन पळून जात असलेल्या आरोपींना पोलिसांनी पकडलं. हे आरोपी पळून जात होते, त्यावेळी त्यांना नारायणगाव पोलिसांनी पाठलाग करुन जेरबंद केलं.
अवैद्य गुटखा तस्करी करत असलेल्या वाहनाचा पाठलाग करत असताना, आरोपींनी गाडी जोरात पळवली. त्यावेळी उपस्थित पोलीस आणि होमगार्डने थेट गाडीवर लाठीहल्ला करुन गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. नंबरप्लेट नसलेल्या लाल रंगाच्या स्विफ्टमधून ही अवैध गुटखा वाहतूक केली जात होती.
दरम्यान, पोलिसांनी किशोर धवडे आणि हानिफ तांबोळी यांना ताब्यात घेतलं. हे दोघेही शिरुरचे रहिवासी आहेत. अधिक चौकशीनंतर किशोर धवडे हा पुणे जिल्ह्यातील शिरुर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस हवालदार असल्याचं उघड झालं.
Leave a comment