मुंबई:
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता दहावीची शिल्लक असलेली भूगोल विषयाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली. दरम्यान, इयत्ता नववी आणि अकरावीच्या वार्षिक परीक्षा होणार नसल्याचेही गायकवाड यांनी जाहीर केले. नववी, दहावी आणि अकरावीच्या विद्यार्थी-पालकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
करोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महाराष्ट्रातील लॉकडाऊन स्थितीत ३० एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी हा निर्णय जाहीर करताना सांगितले की, 'इयत्ता नववी आणि अकरावीच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातली संचारबंधी ३० एप्रिलपर्यंत वाढवल्याने हा निर्णय घेण्यात येत आहे. नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचे पहिल्या सत्रातील चाचण्या, प्रात्यक्षिकांमधील गुण यानुसार त्यांचे अंतर्गत मूल्यमापन होणार आहे. तसेच इयत्ता दहावीची शिल्लक राहिलेली भूगोल विषयाची आणि अन्य कार्यशिक्षण विषयाच्या परीक्षा देखील रद्द करण्यात आल्या आहेत. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला या विद्यार्थ्यांच्या या विषयाच्या मूल्यमापनासंदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.'
Leave a comment