मुंबई:
मुंबई आणि परिसरासह राज्यभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, आज दिवसभरात २२१ रुग्णांची नव्याने नोंद झाली आहे. आज दिवसभरात २२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकट्या मुंबईत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत ९१ रुग्णांचा करोनानं बळी गेला असून, राज्यातील आकडा १४९ वर पोहोचला आहे. राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या दोन हजारांच्या जवळपास पोहोचली आहे.
महाराष्ट्रात करोनाबाधित रुग्णांची संख्या रविवारी दिवसभरात वाढली असून, राज्यात नवीन २२१ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. गेल्या २४ तासांत २२ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, यात सर्वाधिक १६ रुग्ण मुंबईचे आहेत. पुण्यातील तीन, नवी मुंबईचे दोन आणि सोलापूर येथील एक मृत रुग्णाचा समावेश आहे. यामुळे करोनाबाधित रुग्णांची राज्यातील मृत्यूची एकूण संख्या १४९ इतकी झाली आहे, अशी माहिती राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
दिल्लीच्या निजामुद्दीन येथील तबलिग जमातच्या बंगलेवाली मशिदीत मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या धार्मिक इज्तेमात महाराष्ट्रातील ज्या नागरिकांनी सहभाग घेतला होता. त्यांचा सर्व जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासनाकडून कसून शोध घेण्यात येत आहे. यातील ७५५ रुग्णांची प्रयोगशाळा तपासणी करण्यात आली असून, राज्यात अशा व्यक्तीपैंकी ३७ जण करोनाबाधित आढळले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली.
निजामुद्दीन मरकजसंबंधित लातूरमध्ये आठ, यवतमाळ येथे सात, बुलढाणा जिल्ह्यात सहा, मुंबईत तीन तर प्रत्येकी दोन जण पिंपरी चिंचवड आणि अहमदनगर भागातील आहेत. रत्नागिरी, नागपूर मनपा, हिंगोली, जळगाव, उस्मानाबाद, कोल्हापूर आणि वाशिममध्ये प्रत्येकी एक रुग्ण करोनाबाधित आहे. याशिवाय या व्यक्तींच्या निकट संपर्कातील सहा जण अहमदनगर येथे तर एक जण पिंपरी चिंचवडमध्ये करोनाबाधित आढळला आहे.
Leave a comment