बदनापूर । वार्ताहर
लॉकडाऊनमध्येही वाळू माफियांचा चोरून वाळूची वाहतूक व अवैध विक्री करण्याचे प्रकार तालुक्यात सुरूच असल्यामुळे पोलिस प्रशासनानही कडक भूमिका घेतलेली असून काजळा परिसरातील बुटेगाव शिवारात अवैध वाळू वाहतूक करणाऱे ट्रॅक्टर थेट जप्त करून पोलिस ठाण्यात आणल्यामुळे वाळू माफियात खळबळ उडाली आहे.
अवैधरीत्या वाळू उपसा करून त्याची वाहतूक करण्याचा व्यवसाय बदनापूर तालुक्यात दिसून येत आहे. वेळोवेळी पोलिस व महसूल प्रशासन कारवाई करत असतानाही वाळू माफिया रात्री - बेरात्री वाहतूक करून अवैधरित्या नदीपात्रातून खोदकाम करून वाळू विक्री करण्याच्या घटना घडत आहेत. शुक्रवारी (दि. 31 जुलै) सायंकाळी सहायक फौजदार निवृत्ती शेळके व पोलिस कर्मचारी मनोज निकम हे काजळा शिवारात गस्त घालत असताना त्यांना बुटेगाव येथील नदीपात्रातून वाळूचे अवैधरीत्या उत्खनन करून वाहतूक करणारा ट्रॅक्टर आढळून आला असता त्यांनी सदरील ट्रॅक्टर व त्याचा चालक सर्जेराव ज्ञानदेव खंडेकर याला ताब्यात घेऊन थेट पोलिस ठाण्यात आणून गुन्हा नोंद केला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक मारुती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान पोलिसांनी अवैध वाळू वाहतुक व विक्री करणार्यांविरोधात थेट गुन्हे नोंदवून वाहने जप्त करत असल्यामुळे वाळू माफियात मात्र खळबळ उडाली आहे.
Leave a comment