आष्टी : रघुनाथ कर्डीले
कोरोनामुळे शासनाने पुकारलेल्या संचारबंदी आणि लॉकडाऊनमुळे आष्टी तालुक्यातील सुमारे पाचशे पेक्षा जास्त रिक्षांची चाके थांबली आहेत. त्यातील निम्म्याहून अधिक रिक्षा कर्जावर घेतल्या आहेत. त्यामुळे रिक्षाचालकांचा संसाराचा गाडाही थांबला आहे. त्यामुळे रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. देशावर संकट आल्याने रिक्षाचालक संसाराचाही विचार न करता त्यात प्रशासनासोबत उभा राहिले आहेत खरे, मात्र त्यांच्या रिक्षांसह संसाराचीही चाके थबकल्याने त्यांच्याकडे कोणाचेच लक्ष नाही, अशी स्थिती आहे.
तालुक्यात पाचशेहुन अधिक रिक्षा आहेत. त्यात टमटम,पियाजीओचा समावेश आहे. दररोज कडा,आष्टी,धामणगाव, मिरजगाव,धानोरा,देवळाली,सुलेमान देवळा,मेहकरी, खडकत, डोईठान अशा वेगवेगळ्या रस्त्यांवर रिक्षा धावत असतात. जवळपास 50 टक्के रिक्षा चालकांनी कर्ज काढून वाहन खरेदी केले आहेत. अनेक जणांनी अशी परिस्थिती आहे की, दिवसभर रिक्षा चालली तरच संध्याकाळी घरी चुल पेटते.मात्र, कोरोनामुळे संचारबंदी व लॉकडाऊनचा कालवधी रिक्षाचालकांसाठी मरण यातना देणारा ठरतो आहे.
रिक्षांची चाके 22 मार्चपासून थबकली आहे. अत्यावश्यक सेवेत त्यांचा समावेश होत नसल्याने त्यांना बाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांवर जणू आर्थिक संकट कोसळले आहे. कर्ज काढून व्यवसायात आलेल्या रिक्षा मालकांपुढे रिक्षाचे हप्ते फेडायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा बनला आहे.
■■
उदरनिर्वाह कसा भागवणार
भारत लॉकडाउन झाल्यानंतर अनेक रोजंदारीवर पोट भागवणाऱ्यांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. त्यातच रिक्षा, टॅक्सी चालकांचा प्रश्न गंभीर आहे. शासनाने अनेक योजना राबविणे सुरू केले असले, तरी दुकाने बंदच्या पार्श्वभूमीवर त्याही मोठ्या अडचणी आहेत. त्यातच रेशन आदींसाठी अर्ज भरणे तसेच दुकानांवर मोठी गर्दी होत असल्याने हालच असल्याच्या प्रतिक्रिया टॅक्सी, रिक्षा चालकांनी दिल्या आहेत. शासनाने घरपोच सुविधा पुरवाव्यात अशी मागणी आता होऊ लागली आहे.
◆◆◆
मी सुशिक्षित बेरोजगार असून नौकरी न लागल्याने गेल्या सात वर्षांपासून कडा आष्टी रोडवर रिक्षा चालवत असून गेल्या सतरा आठरा दिवसापासून संचारबंदी मुळे रिक्षा बंद असल्याने कुटुंब कसे चालवायचे असा प्रश्न पडल्याने मी तालुक्यातील शेतकरी वर्गाकडून टरबूज,खरबूज, चिकू,भाजीपाला खरेदी करत असून शासनाने ठरवून दिलेल्या वेळेत कडा शहरात रिक्षातच दुकान लावून दोन पैसे मिळून उदरनिर्वाह भागवत आहे.
नितीन जाधव,रिक्षा चालक
Leave a comment