कुणालाही ऑनलाइन मद्य विक्रीची परवानगी नाही : सरकार
[: मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाने कोणालाही ऑनलाइन मद्य विक्री करण्याचा परवाना दिलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी यासंदर्भातील फसव्या जाहिरातींना बळी पडू नये, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे सर्व प्रकारची मद्याची दुकाने सध्या बंद आहेत. या परिस्थितीचा गैरफायदा घेत अनेकांनी सोशल मीडियावर फसव्या जाहिराती देऊन ग्राहकांची फसवणूक करत आहे. या फसव्या जाहिरातींना बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. अशा फसव्या जाहिरात देणाऱ्यांवर आता कारवाई करण्यात येणार आहे.
ऑनलाईन वाईन किंवा ऑनलाईन लिकर या मथळ्याखाली घरपोच मद्य सेवा दिली जाईल, अशा प्रकारच्या फेक मेसेजद्वारे सोशल मीडियावर फसव्या जाहिराती दिल्या जात आहेत. ऑनलाइन पेमेंट स्वीकारले जाईल असे सांगून चोरट्यांकडून फसवणूक केली जात आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे देशात व राज्यात लॉकडाऊन झालेला आहे. राज्यातील सर्व मद्यविक्री दुकाने बंद असून अवैध मद्य निर्मिती, वाहतूक, विक्री याविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाची राज्यस्तरावर निरंतर कारवाई सुरू आहे.
Leave a comment