नवी दिल्ली :
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव संपूर्ण देशात फैलावत आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार आपापल्या परीने विविध उपाययोजना करत आहेत. त्यातच आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देखील सर्व राज्यांना सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाण्यावर आणि थुंकण्यावर बंदी घालायला सांगितले आहे.
सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात सांगितले आहे की, तंबाखू, पान मसाला आणि सुपारी खाल्ल्यामुळे शरीरात लाळ अधिक प्रमाणात तयार होऊन ती थुंकण्याची इच्छा होते. आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे कोविड – 19 चा प्रसार मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतीय आर्युविज्ञान चिकित्सा परिषदेने जनतेला तंबाखू खाण्यापासून दूर रहा आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका असे आवाहन केले आहे.
दरम्यान बिहार, झारखंड, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, महाराष्ट्र, हरयाणा, आसाम अशा अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाऊन थुंकण्यास बंदी घातली आहे. दरम्यान शनिवारपर्यंत देशात कोरोनाबाधितांची संख्या 7447 झाली असून आतापर्यंत 239 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
11
Apr
Leave a comment