बीड । वार्ताहर
राज्यातील लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत कायम राहणार आहे, अशी घोषणा आज, शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. हा लॉकडाऊन कधीपर्यंत पुढे सुरूच राहील, हे तुम्हा-आम्हा सर्वांच्या हातात आहे. विषाणूची साखळी आहे, ती तोडायची आहे. ती तोडली की आपण सगळे या साखळदंडातून बाहेर पडू, असा धीरही त्यांनी राज्यातील नागरिकांना दिला.
राज्यभरामध्ये आणि विशेषत: मुंबईमध्ये कोरोनाचा विळखा वाढत असल्याने लॉकडाऊन वाढवण्याची मागणी मुंबईसह पुणे, पिंपरीचिंचवड, नागपूर आदी शहरातील प्रशासनाने मुख्यमंत्र्यांकडे केली होती. एवढेच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशातील सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. त्यावेळी महाराष्ट्र, पंजाब आणि पश्चिम बंगाल या तीन राज्यातील मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या परिस्थितीची माहिती देत लॉकडाऊन वाढवून देण्याची मागणी केली. त्या पार्श्वभूमीवर येत्या 30 एप्रिलपर्यंत म्हणजे 15 दिवस पुन्हा लॉकडाऊन वाढणार आहे. मात्र या लॉकडाऊनमध्ये काही बाबींना सवलती देण्यात येण्याचा विचार करण्यात येणार आहे.दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी देखील राज्याचा लॉकडाऊन वाढणार असल्याचे जाहिर केले आहे.
देशभरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून देशात साडेसात हजाराच्या पुढे रूग्णांची संख्या केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रात 20 टक्के रूग्ण संख्या झाली आहे. एकट्या मुंबईमध्ये 1 हजाराच्या पुढे रूग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 26 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील सर्व राज्यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रूग्ण असून 2548 रूग्णांमध्ये 1 हजार एकट्या मुंबईत आहेत. मुंबईमध्ये काहि ठिकाणी हॉटस्पॉट करण्यात आले असून या भागामध्ये शासकीय यंत्रणेद्वारे जनतेेला सोयी-सुविधा पुरविल्या जात आहेत. पुणे-मुंबई आणि नागपूर त्याचबरोबर राज्यातील सांगली, बुलढाणा, नाशिक या जिल्ह्यात कोरोनाचा प्रार्दुभाव आढळून आल्याने राज्याचे लॉकडाऊन वाढवण्याच्या मनस्थितीमध्ये मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सुरूवातीपासूनच होते. गेल्या दोन दिवसांपुर्वी जनतेशी संवाद साधतांना त्यांनी तसे संकेतही दिले होते. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रशासकीय आढावा घेऊन त्यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्यातील एकंदरीत परिस्थितीशी माहिती दिली. सामुहिक संसर्ग अद्याप राज्यामध्ये सुरू झाला नसला तरी मुंबईमध्ये त्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्या पार्श्वभुमीवरच राज्यातील लॉकडाऊन वाढवला गेल्याचे सांगण्यात आले आहे.
Leave a comment