जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. बीड जिल्ह्यातही नुकताच एक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी कोरोना प्रसार रोखण्यासाठी दशसूत्री तयार केली आहे. कोरोनामुळे होणाऱ्या COVID-19 या रोगाचा प्रसार आपल्या गावात होण्यापासून रोखणे हे शक्य असून हे आपले आद्यकर्तव्य आहे. प्रशासनाला या दशसूत्रीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी बीड जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सहकार्य केल्यास कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होणार आहे. ही दशसूत्री पुढीलप्रमाणे
1) जिल्हा बंदीची प्रभावी अंमलबजावणी करणे
महाराष्ट्र राज्यात दिनांक 13 मार्च 2020 पासून कोरोना विषाणुंच्या संसर्गाने होणाऱ्या COVID-19 या साथ रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंध कायदा 1887 लागू असून मा. जिल्हाधिकारी, बीड यांच्या आदेशान्वये संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या असून जिल्ह्यातून कोणत्याही नागरिकास गावात प्रवेश देऊ नये. नागरिकांनीही प्रवेश करू नये व केल्यास प्रशासनास लपवून ठेवू नये.
एखादी व्यक्ती /कुटुंब हे शासनाने प्राधिकृत केलेल्या सक्षम अधिकारी /पोलीस अधिकारी यांच्याकडून पास घेवून प्रवास करून आला असेल तर अशा व्यक्तीने / कुटुंबाने गावात आल्याच्या दिनांकापासून 14 दिवसांकरिता स्वतःच्या घरात अलगीकरण (Home Quarantine) करून घ्यावे व याची अंमलबजावणी होत असल्याबाबत यंत्रणांनी खात्री करावी. संबंधित कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने त्या 14 दिवसांच्या कालावधीत बाहेर पडू नये.
2) आरोग्य विषयक खबरदारी घेणे
गावातील कोणत्याही व्यक्तीस आरोग्य विषयक कोणतीही समस्या विशेषत: (ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास) असल्यास गावातील परिचारिका, ग्रामसेवक, आशा सेविका अथवा नजीकच्या आरोग्य संस्थेशी संपर्क साधावा.गावातील सर्व व्यक्तींनी खोकताना व शिंकताना तोंडावर रुमाल अथवा कापड धरावा.
3) सोशल डिस्टनिंगचे काटेकोरपणे पालन करणे
जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिलेल्या वेळेत गावातील ज्या वेळेस संचारबंदीत शिथिलता दिली असेल, त्या कालावधीत गावातील कमीत कमी लोकांनी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी, राशनसाठी बाहेर पडावे.अनावश्यक गर्दी करू नये. कोणत्याही परिस्थितीत Social Distancing (दोन व्यक्तीमध्ये अंतर कमीत कमी 3.5 फूट असेल अशा पद्धतीने) चे पालन करावे, राशन दुकान, भाजीपाला दुकान, औषध दुकान मालकांनी ठराविक अंतर पाळून नागरिकांनी रांगेत उभारण्याची व्यवस्था करावी.
4) सार्वजनिक /वैयक्तिक स्वच्छता
सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावरती पूर्णत: निर्बंध आणावेत. घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने हातरुमाल /कापडी मास्क याचा वापर करावा. सार्वजनिक ठिकाणाचे योग्य पद्धतीने निर्जंतुकीकरण केले जाईल, याची खबरदारी घ्यावी. गावातील सर्व नागरिकांनी वारंवार हात साबणाने स्वच्छ धुवावेत. याबाबत सातत्याने जनजागृती करावी.
5) संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करणे
गावातील आठवडी व जनावरांचे बाजार बंद करावेत. जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी एका वेळी घरातील एकाच व्यक्तीने बाहेर पडावे. तसेच गावांमध्ये अनावश्यक फिरणाऱ्या नागरिकास संचारबंदीचे पालन करण्याचे महत्त्व दाखवून द्यावे. याउपरही एखादा नागरिक संचारबंदीचे उल्लंघन करून गावाचे आरोग्य धोक्यात टाकत असेल तर त्वरित नजीकच्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करावी.
6) होम क्वारंटाईन व्यक्तीवरती देखरेख ठेवणे
आरोग्य विभागाकडून ज्या व्यक्तींना होम क्वारंटाईन (घरात अलगीकरण) करण्याविषयी सूचित केले आहे, अशा व्यक्तींनी तसेच कुटुंबातील इतर सदस्यांनी 14 दिवसांच्या कालावधीत घराबाहेर पडू नये. तसेच गावातील नागरिकांनी, नातेवाईकांनी होम क्वारंटाईन घरांमध्ये नमूद 14 दिवस कालावधीत प्रवेश करू नये. याबाबत ग्रामपंचायतीने आपले कर्मचारी/स्वयंसेवक नेमून सातत्याने देखरेख ठेवावी.
7) गावात बाहेरून आलेल्या व्यक्तींची नोंद घेणे
गावात बाहेरून आलेल्या व्यक्तींची /कुटुंबाची इत्यंभूत माहितीसह नोंद घेण्यासाठी नोंद वही तयार करावी. तसेच प्रत्येक घरामध्ये देखील अशाच प्रकारची नोंदवही ठेवावी, ज्यामध्ये बाहेरून येणाऱ्या व्यक्तीची, भेटलेल्या व्यक्तीची नोंद घेतली जाईल. यंत्रणांनी याची खात्री करावी.
8) सामाजिक व धार्मिक सलोखा जपणे तसेच सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करणे
गावात कोणत्याही प्रकारच्या धार्मिक, सामाजिक अथवा इतर कामास लोक जमा होणार नाहीत, याची खात्री करावी. तसेच मा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये मंदिर, मस्जिद व इतर धार्मिक स्थळे ही सामान्य नागरिकांसाठी पूर्णत: बंद असल्याबाबत लोकांना अवगत करावे. दिल्ली अथवा इतर कोणत्याही धार्मिक ठिकाणाहून आलेल्या लोकांची माहिती त्वरित प्रशासनास द्यावी व तसे करत असतांना धार्मिक द्वेष व कटुता वाढेल अशा प्रकारचे कोणतेही वर्तन करू नये.
9) बालके, वयोवृद्ध, गरोदर स्त्रिया, दिव्यांग यांची विशेष काळजी घेणे
लहान बालके, 60 वर्ष वयावरील नागरिक, गरोदर स्त्रिया तसेच ज्यांना हृदयरोग, उच्च रक्तदाब, क्षयरोग, रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे अशा व्यक्तीने घराबाहेर पडू नये याची दक्षता घ्यावी. तसेच त्यांच्या आरोग्यविषयक गरजांची काळजी घेण्यात यावी. लागणारी मदत वेळोवेळी घरपोच करण्याची व्यवस्था करावी.
10) आर्थिक व सामाजिक दर्बल घटकांच्या दैनंदिन गरजांची काळजी घेणे
गावातील / सामाजिक / आर्थिक व शारीरिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांची दखल घेऊन त्यांना जीवनावश्यक वस्तू (भाजीपाला, किराणा,औषधी) तसेच आरोग्य सेवा मिळत असले बाबत वेळोवेळी खात्री करावी. प्रशासनाबरोबरच नागरिकांनीही आपले कर्तव्य पार पाडून गावाला व जिल्ह्याला या संकटापासून दूर ठेवण्यास प्रशासनास सहकार्य कराल.
(संकलन - जिल्हा माहिती कार्यालय, बीड)
Leave a comment