बीड (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील एक रुग्ण अहमदनगर जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर मागील दोन दिवसांपासून जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य यंत्रणा पिंपळा (ता.आष्टी) गाव परिसरात कामाला लागली आहे. शुक्रवारी (दि.10) सायंकाळपर्यत पिंपळा परिसरातील 2 हजार 620 घरांचा सर्वे करत 12 हजाराहून अधिक व्यक्तींची आरोग्य तपासणी केली गेली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी ही माहिती दिली.
बीड जिल्ह्यात बुधवारपर्यंत (दि.8) कोरोनाचा एकही संशयित रुग्ण आढळलेला नव्हता. आष्टी तालुक्यातील पिंपळा येथील दोघे जण नगर येथे तबलिगींच्या संपर्कात आले होते. ते 2 एप्रिलला पिंपळा येथे परतले होते. आरोग्य यंत्रणेला माहिती झाल्यानंतर दोघा संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले गेले होते. त्यातील एकाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह तर दुसर्याचा निगेरिटव्ह आलेला आहे. बाधित रुग्ण नगर जिल्हा रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात आहे.हा एक रुग्ण बीड जिल्हा हद्दीतील असल्याने आरोग्य यंत्रणेने तातडीने पुढील उपाययोजना हाती घेतल्या आहेत. रुग्णाच्या कुटूंबातील तीन व त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर तिघांचे स्वॅब दोन दिवसापूर्वी औरंगाबादला पाठवले गेले होते. सुदैवाने शुक्रवारी (दि.10) सायंकाळी त्या सर्वांचे रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आले आहेत. या दरम्यान पिंपळा व परिसरात प्रादुर्भाव वाढू नये, लोकांनी स्वच्छता पाळतानाच कुठेही गर्दी करण्याचा प्रयत्न करु नये यासाठी सर्व आरोग्य अधिकारी, कर्मचारी आवाहन करत आहेत. दरम्यान एक रुग्ण आढळून आल्यानंतर जिल्हा आरोग्य यंत्रणेने जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाच्या अधिकारी-कर्मचार्यांनी पिंपळा परिसरातील पिंपळा, धनगरवाडी, काकडवाडी, खरडगव्हाण,सुंबेवाडी,नांदूर,लोणी,कोयाळ कुंटेफळ, सोलापूरवाडी, ढोबळसांगवी (ता.आष्टी) या गावांतील 12 हजार 341 व्यक्तींची आरोग्य तपासणी केली आहे.दरम्यान जिल्ह्यात आतापर्यत परदेशातून आलेल्या 116 जणांपैकी सद्यस्थितीत केवळ 1 जण होम क्वॉरंटाईन आहे. उर्वरित 115 होम क्वांरंटाईनमधून बाहेर पडले आहेत. याशिवाय बाहेर जिल्ह्यातून आलेले व जिल्ह्यात गृह अलगीकरणात असलेल्या व्यक्तींची संख्या 58 इतकी आहे. तर 91 जण संस्थात्मक अलगीकरणात आहेत.शुक्रवारपर्यंत जिल्हा सामान्य रुग्णालयात 83 जणांचे तर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालयात 26 जणांचे असे एकूण 109 जणांचे नमुने तपासण्यात आले ते सर्व नमुने निगेटिव्ह आले आहेत.
Leave a comment