त्या कुटुंबातील सर्व सहा जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह
बीड । वार्ताहर
आष्टी तालुक्यातील पिंपळा मौजे पिंपळा येथे बुधवारी (दि.8) सकाळी 1 कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली. दरम्यान या कुटुंबातील 3 व त्यांच्या संपर्कात आलेल्या अन्य तिघांना जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. त्या सर्वांचे रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आले आहेत. शिवाय अंबाजोगाई येथील अन्य एका रुग्णाचा रिपोर्टही निगेटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली.
आष्टी तालुक्यातील पिंपळा येथे कोरोनाचा एक रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणा कामाला लागली. परिसरातील 10 गावातील 2103 घरांचे सर्व्हेक्षण आरोग्य पथकाकडून करण्यात आले, दुसरीकडे हा संपूर्ण परिसर अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आला आहे. दरम्यान कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या कुटुंबातील तीन व त्यांच्या संपर्कात आलेल्या अन्य तिघांना बुधवारी सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तिथे विलगीकरण कक्षात त्यांचे थ्रोट स्वब नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते.
त्या सर्वांचा रिपोर्ट शुक्रवारी(दि.9) सायंकाळी जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाला असून सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा बीड जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे. शुक्रवारपर्यंत जिल्हा सामान्य रुग्णालयात 83 जणांचे तर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालयात 26 जणांचे असे एकूण 109 जणांचे नमुने तपासण्यात आले ते सर्व नमुने निगेटिव्ह आले आहेत, सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात 7 तर अंबाजोगाईच्या स्वारातीमध्ये एका रुग्णास विलगीकरण कक्षात ठेवले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
Leave a comment