पेठ बीडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई
कुपनमुळे झाला भंडाफोड
बीड । वार्ताहर
गुटख्याच्या तस्करीचे मोठे रॅकेट पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. गुटख्याच्या खरेदी-विक्री व्यवहारातील सुमारे 40 कोटींचे कुपन पोलिसांच्या हाती लागल्याने एकच खळबळ उडाली आहे.पेठ बीड पोलिसांनी बुधवारी (दि.8) रात्री हा भंडाफोड केला असून जप्त केलेल्या कुपननुसार तब्बल 40 कोटींच्या गुटख्याची बीडमध्ये तस्करी झाली, असल्याचा अंदाज आहे. दरम्यान, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, पोलीस उपअधीक्षक भास्कर सावंत हे पेठ बीड ठाण्यात तळ ठोकून होते.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, शहरातील गांधीनगरमधील महेबूब खान याचे भंगार व टायरचे दुकान आहे. तेथे गुटख्याचे लाखोंचे कुपन साठा करुन ठेवल्याची माहिती पेठ बीड पोलीस ठाण्याचे निरीक्षक विश्वास पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी बुधवारी रात्री साडेआठ वाजता सहकार्यांना सोबत घेऊन छापा टाकला. यावेळी तेथे लाखो रुपयांच्या कुपनचे गठ्ठे आढळले. ते ताब्यात घेऊन ठाण्यात आणण्यात आले. दरम्यान,कुपन मिळाले पण गुटखा मिळाला नाही. त्यामुळे या प्रकरणात गुन्हा दाखल काय करायचा? असा पेच निर्माण झाला होता. मात्र, कायदेशीर सल्ला घेऊन गुरुवारी रात्री आठवाजता गुन्हा नोंद करण्याच्या हालचाली सुरु झाल्या. पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या फिर्यादीवरुन विषद्रव्याची विक्री व त्यास प्रोत्साहन देण्याचे कृत्य केल्याचा गुन्हा नोंदविण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कुपनची मोजदाद करताना पोलीस कर्मचारी घामाघूम झाले होते. एकूण 40 कोटी रुपये किंमतीचे हे कुपन पोलिसांच्या हाती लागले असून, त्यानुसार तेवढ्याच किंमतीच्या गुटख्याची तस्करी झाली असावी, असा पोलिसांचा कयास आहे. दरम्यान पेठ बीड पोलिसांनी चलन ताब्यात घेतले;परंतु गुटखा न मिळाल्याने नेमका काय गुन्हा नोंद करायचा? असा संभ्रम होता. मात्र, दुपारनंतर ही माहिती वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना कळाली, त्यानंतर कारवाईला वेग आला. अप्पर अधीक्षक विजय कबाडे व उपअधीक्षक भास्करराव सावंत यांच्या उपस्थितीत चलनांची मोजदाद केली, त्यानंतर गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु झाले.
चाळीस कोटींचे कुपन हस्तगत-विजय कबाडे
गुटख्याची तस्करी करण्यासाठी या कुपनचा चलन म्हणून वापर केला जात असावा. कुपनप्रमाणे तितक्याच किंमतीचा गुटखा बीड जिल्ह्यात विक्री केला असावा, असा अंदाज आहे. तपासात आणखी काही बाबी स्पष्ट होतील.सुमारे 40 कोटींचे कुपन हस्तगत करण्यात आले आहेत अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी दिली.
गुटख्याची पहिलीच मोठी कारवाई
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार,अधिकाधिक गुटखा विकला जावा यासाठी डिलरला सवलत कुपन दिले जातात. गुटखा विक्रीच्या प्रमाणात सवलत कुपनची किंमत ठरलेली असते. पुढील खरेदीवेळी या कुपनआधारे उर्वरित रक्कम कापून घेतली जाते. हे कुपन म्हणजे गुटख्याच्या धंद्यातील चलनच असल्याचे सांगण्यात आले. अशा प्रकारच्या कुपन सिस्टमचा भंडाफोड करणारी बीड पोलिसांची ही पहिलीच मोठी कारवाई आहे.
Leave a comment