बीड : :
लॉकडाऊनच्या काळात दुचाकीत पेट्रोल टाकून हिंडण्यासाठी तरुणाईचा जीव कासावीस झाला आहे. त्यासाठी शहरी भागासह ग्रामीण भागातील दुचाकीच्या पेट्रोलसाठी वेगवेगळ्या शक्कल लावल्या जात आहेत. पेट्रोलसाठी घरातील वृद्धांच्या आजाराच्या फाईल, भाजीपाल्यासाठी वापरली जाणारी कॅरेट, फॅमिली डॉक्टरकडे प्रिस्किप्शनच्या चिठ्ठीसाठी गळ घातली जात आहेत. यामुळे डॉक्टर, पोलिस व पेट्रोलपंप चालकांची डोकेदुखी वाढली आहे.कोरोनामुळे आचारसंहिता लागू असताना ग्रामीण भागातील युवापिढीकडून पेट्रोलसाठी अनेक युक्त्यांचा वापर केला जात आहे. दुचाकीवर भाजीपाल्यासाठी वापरली जाणारी मोकळी रिकामे कॅरेट, गाडीवर ओला चारा, घरातील आजारी माणसांच्या जुन्या फाईल, फॅमिली डॉक्टरकडून प्रिस्किप्शनच्या चिठ्ठ्यांसाठी गळ घातली जात आहे. मात्र, किरकोळ आजार असणाऱ्यांना डॉक्टर दाद न देता घरी बसण्याचा सल्ला देताना दिसत आहेत.लॉकडाउनच्या काळात गावात गल्लोगल्ली दुचाकीवरून फिरणाऱ्या युवकांना चांगलाच चाप बसला आहे. विनाकारण फिरणाऱ्या युवकांना पोलिसांना लाठ्यांचा प्रसादही दिला आहे, तर दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी कारवाईत सुमारे 150-200 दुचाकी जमा करून घेतल्या आहेत. अनेक युवक गावातील पेट्रोल पंपावरच्या कामगारांशी, पोलिसांशी हुज्जत घालत आहेत. पंपावरचे कर्मचारी हे पोलिसांच्या हजेरीतच पेट्रोल विक्री करणे पसंत करीत आहेत. कित्येकदा कर्मचाऱ्यांना अंगावर जाऊन शिवीगाळ करणे, ताटकळत पंप परिसरात घिरट्या मारणे, भाजीपाल्याची रिकामी कॅरेटसह दुचाकीवरून पंपवार हजेरी लावणे, गावातील मोठ्या व्यक्तीस फोन लावणे
या प्रकाराने डॉक्टर, पोलिस व पेट्रोल पंपचालकांची डोकेदुखी वाढली आहे. समाजहितासाठी लॉकडाउनच्या काळात घरी बसणे बंधनकारक असताना युवकांनी संयम राखणे गरजेचे ठरत आहे.
Leave a comment