पोलीस प्रशासनाच्या ट्रॅक्टर चालकांना नोटीस
शेतीचे वाद टाळण्यासाठी बीड पोलीसांचा स्तुत्य उपक्रम
बीड । वार्ताहर
शेतीचा बांध फोडण्यावरुन वादाची स्थिती निर्माण होते, यातूनच गंभीर गुन्हे घडत आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी गुन्हेगारी वाढू नये यासाठी स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.जिल्ह्यातील गावोगावच्या ट्रॅक्टरचालकांनी शेतीची नांगरणी, फराटणी, पेरणी करत असताना बांध कोरला जाणार नाही याची दक्षता घ्यावी. वाद टाळण्यासाठी शहनिशा आणि पूर्ण खात्री करावी. शेजारील शेताच्या बांधापासून किमान दोन फुट अंतर ठेवूनच शेतीचे कामकाज करावे अन्यथा आपल्यावरही कायदेशीर कारवाई होवू शकते अशा सूचना नोटीस जारी करत दिल्या आहेत.
बीड जिल्ह्यात सध्या खरीप हंगामासाठी शेत मशागतीचे व पेरणीला वेग आला आहे.मशागती दरम्यान शेतबांधाची यांची छेडछाड होऊन बांधावरून धुर्यावरुन शेतकर्यांमध्ये वाद निर्माण होत असून काही प्रकरणांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडलेले आहेत. बहुतेक शेत जमिनीचे मशागतीसाठी ट्रॅक्टरचा उपयोग होता. मशागत करताना कधीकधी नजरचुकीने सुध्दा बांधाचे नुकसान होऊन वाद होऊ शकतात. सदरील वाद निर्माण होण्यासाठी काही अंशी टॅक्टर मालक-चालक यांची सुध्दा चुक असल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे शेतीची नांगरणी, फराटणी, पेरणी करत असताना बांध कोरला जाणार नाही याची दक्षता घ्यावी. वादग्रस्त जमिनीची मशागत करण्यापूर्वी दोन्ही गटाशी सल्लामसलत करावी.एखाद्या शेतीचे पुर्वीचे वाद-विवाद आहेत किंवा कसे याबाबतची खात्री करूनच एखादे काम घ्यावे. अन्यथा उद्भवणार्या प्रसंगामुळे आपल्यावर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. या नोटिसा पोलीस ठाण्यांमधून गावोगावचे सरपंच, पोलीस पाटील व तंटामुक्ती अध्यक्ष यांच्या मार्फतीने ट्रॅक्टर मालक व चालक यांना गावोगावी देण्यात येत आहेत.
Leave a comment