अधीक्षक कार्यालयात नागरिकांना प्रवेश बंद
बीड । वार्ताहर
बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यानंतर आता आज शनिवारी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार हे ही होम क्वॉरंटाईन झाले आहेत. दरम्यान पोलीस अधीक्षक कार्यालयातून लेखी परवानगी असल्याशिवाय अधीक्षक कार्यालयात कोणीही येणार नाही अशा सूचना दिल्या आहेत.
पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या समवेत जे पोलीस सुरक्षेसाठी होते त्यांच्या संपर्कात आल्याने पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी हा निर्णय घेतला आहे. बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या स्टाफमधले पाच जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर बीड जिल्ह्यातील अनेक अधिकारी आणि कर्मचार्यांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. दुसरीकडे शुक्रवारी एसपी हर्ष पोद्दार यांनी जिल्ह्यातील सर्व अप्पर अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि सर्व ठाणे प्रभारी यांना आदेश जारी करत पोलीस अधीक्षक कार्यालयातून लेखी परवानगी असल्याशिवाय अधीक्षक कार्यालयात कोणीही येणार नाही अशा सूचना दिल्या आहेत. शिवाय अधीक्षक कार्यालयातील कार्यालयीन कर्मचारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त कोणालाही या कार्यालयात प्रवेश देवू नये. नागरिकांचे अर्ज, सर्व प्रकारचे टपाल हे अधीक्षक कार्यालयाच्या प्रवेशव्दारातील कर्मचार्यांकडे सोपवून तशी पोहच घ्यावी अशा सूचनाही दिल्या गेल्या आहेत. कोरोनाचा धोका लक्षात घेवून या सर्व उपाययोजना केल्या आहेत.
Leave a comment