बीड । वार्ताहर
राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त शुक्रवारी (१२ जून) समोर आले आहे. दरम्यान, धनंजय मुंडे कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या व स्वीय सहाय्य्यकांच्या संपर्कात आलेल्या तब्बल १०८ पैकी ३४ जणांचे स्वॅब काल रात्री अंबाजोगाई येथील कोवीड-19 तपासणी सेंटरला पाठवण्यात आले. या ३४ जणांचे रिपोर्ट आले असून त्यांपैकी एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. त्या पॉझिटिव्ह व्यक्तीला आरोग्य प्रशासनाने पुढील उपचारासाठी ताब्यात घेतले आहे. तर परळीकरांना प्रशासनाने काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहे. मात्र, ती एक व्यक्ती वगळता धनंजय मुंडेंच्या कुटुंबियांसह जवळपास अन्य सर्व निकटवर्तीयांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, ही दिलासादायक बाब आहे.
धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या ५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यात धनंजय मुंडेंचे २ स्वीय सहाय्यक, मुंबईतील आणि बीडमधील वाहन चालक, स्वयंपाकी यांचा समावेश आहे. मात्र, धनंजय मुंडेंसह या कोणत्याही कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची लक्षणे नाहीत. दरम्यान 'धनंजय मुंडेंनी कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. मात्र, त्यांना श्वसनाचा थोडा त्रास होऊ लागल्याने मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे', अशी माहिती राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली. 'धनंजय मुंडे हे फायटर आहेत. ते लवकरच कमबॅक करतील', असा विश्वास राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला. राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
Leave a comment