मुंबई :
करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात यंदा १ मे रोजी महाराष्ट्र दिनी पोलिसांची परेड होणार नाही. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात महाराष्ट्र दिनी पोलीस परेड न होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानातून कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत भाग घेतला. यावेळी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. तसेच १ मे महाराष्ट्र स्थापना दिन आणि कामगार दिनानिमित्त मुंबईतल्या शिवाजी पार्क आणि राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोणताही सोहळा आणि पोलीस परेड आयोजित न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि निवडक मान्यवरांच्याच उपस्थितीत राज्यभरात ध्वजारोहण करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. तसेच ध्वजारोहण करताना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
संतापजनक; औरंगाबादमध्ये तरुणांचा पोलिसांवर लाठीहल्ला
१ मे हा महाराष्ट्र स्थापना दिन असल्याने या दिवशी राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ध्वजारोहण केलं जातं. तसेच मंत्रालय आणि शिवाजी पार्कातही ध्वजारोहणाचा मोठा कार्यक्रम पार पडतो. या दिवशी पोलीस परेड करून ध्वजाला मानवंदना दिली जाते. मात्र, यंदा राज्यावर करोनाचं संकट असल्याने पहिल्यांदाच राज्यात पोलीस परेड होणार नाही. दरम्यान, मागील १२ ते १४ तासांत राज्यातील करोना रुग्णांचा आकडा तब्बल १६२ नं वाढला आहे. त्यामुळं राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १२९७ वर गेली आहे. त्यात एकट्या मुंबईतील १४३ रुग्णांचा समावेश आहे. मुंबईतील वाढत्या संसर्गामुळं प्रशासनाची चिंता वाढली आहे.
Leave a comment