विजांच्या कडकडातात सर्वदूर पाऊस
बीड । वार्ताहर
यंदा कधी नव्हे ते रोहिणी नक्षत्र सुरू होताच वेळेवर मान्सून पूर्व सरी बरसल्या. बीड तालुक्यासह जिल्ह्यात रविवारी सायंकाळी सर्वदूर पावसाने हजेरी लावली. पावसादरम्यान वेगाने वारे वाहत होते तर काही भागात विजांचा कडकडाट झाला. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला होता.
रविवारी बीडसह तालुक्यातील चौसाळा, मांजरसुंबा परिसरात पाऊस झाला. जिल्ह्यातील पाटोदा, अंबाजोगाई, परळी, गेवराई, केज या तालुक्यातही हा पाऊस झाल्याचे आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी सांगितले. 24 मे रोजी सूर्याचा रोहिणी नक्षत्रात प्रवेश झाला आहे. साधारण या नक्षत्रात वेळेवर पाऊस पडत नाही, यंदा मात्र या नक्षत्रात पावसाच्या सरी बरसल्या. बीड तालुक्यासह पाटोदा शहर व परिसरात पाऊस पाऊण तास झाला. तालुक्यातील डोंगरकिन्ही येथे समाधानकारक पाऊस झाला. अंबाजोगाई शहरासह तालुक्यातील काही भागात सायंकाळी जोरदार वारे, विजांच्या कडकडाटासह अर्धा तास पाऊस पडला. पोलिस ठाण्यासमोरील मिलींदनगर भागातील विद्युत पुरवठा करणार्या तारांवर झाड कोसळल्याने शहराच्या काही भागातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. दरम्यान या पावसानंतर उष्णता वाढली.
माजलगाव परिसरातही जोरदार पाऊस
तालुक्यातील दिंद्रुड, आंबेगाव परिसरासह माजलगाव शहरात सोसाट्याच्या वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात मान्सूनचे जोरदार आगमन झाले. आज दिवसभर वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होता. रात्री 8 च्या दरम्यान वादळी वारा सुटल्यामुळे अनेकांचे घरावरील गोठ्या वरील पत्रे उडून गेले.जोरदार विजांच्या कडकडाटत सुमारे तासभर पावसाच्या सरी कोसळत होत्या.रोहिणी नक्षत्रात पाऊस झाल्यामुळे कृषी बाजारपेठेत खरेदीसाठी लगबग होण्याची शक्यता असून पहिल्या च जोरदार पावसामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. बातमी लिहीपर्यत पाऊस सुरूच होता.
टाकरवणमध्ये वादळी वार्याने मोठे नुकसान
माजलगाव तालुक्यातील टाकरवण परिसरात विजांच्या कडकडाटात वादळी वार्यांसह जोरदार पावसाने हजेरी लावली. या वादळी वार्यात अनेक जणांच्या घरावरील पत्रे उडाली तर झाडांसह विद्युत तारेचे खांब उमळुन पडले व शेतकर्यांचा कांदाही या पावसाने पूर्ण भिजून गेला.
वडवणीतही पावसाची हजेरी
वडवणी शहरासह परिसरात पावसाने हजेरी लावली. रात्री 9 वाजेच्या दरम्यान वादळी वारा सुटला विजेचा कडकडाटत सुमारे आरधा तास रिमझीम पावसाच्या सरी कोसळत होत्या.दरम्यान रात्री 8 वाजल्यापासुन शहरात वादळी वारा सुरू होताच शहरातील सर्व भागातील वीज पुरवठा बंद झाला असून पूर्ण शहर रात्रभर अंधारात होते.
Leave a comment