बीड | वार्ताहर
बीड जिल्ह्यातून आज रविवारी (दि.31) नव्याने 36 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी लातूरच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी ही माहिती दिली.
जिल्ह्यातील मागील तीन दिवसांचे स्वॅब अहवाल पाहिले तर कोरोना बाधीतांची संख्या कमी होताना दिसत आहे. शुक्रवारी (दि.29) तपासणीला पाठवलेल्या 118 पैकी 116 अहवाल निगेटिव्ह आले होते तर 1 अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.अन्य 1 अहवाल अनिर्णयीत आहे. त्यानंतर शनिवारी (दि.30) सकाळी जिल्ह्यातून एकुण 38 जणांचे स्वॅब तपासणीला पाठवण्यात आले होते. पैकी तब्बल 37 जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह तर डोमरी (ता.पाटोदा) येथील 38 वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.सध्या डोमरी गावात पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. आता आज रविवारी सकाळी जिल्ह्यातून 36 स्वॅब तपासणीला गेले आहेत.
आज आणखी 14 जण होणार कोरोनामुक्त
कोरोनावर यशस्वीपणे लढा देता येतो, रुग्णांनी न भीता, संयमाने याचा मुकाबला करावा हा संदेश जिल्हा रुग्णालय प्रशासन आणि जिल्हा आरोग्य विभागाने आपल्या सातत्यपूर्ण सेवेतून दिला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 29 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज दिला जात आहे.काल शनिवारपर्यंत 15 जणांना रुग्णालयातून सुट्टी मिळाली आहे, तर आज आणखी 14 जण कोरोनामुक्त होवून घरी परतत आहेत.यातील 13 व्यक्ती माजलगाव तालुक्यातील तर 1 जण बीड जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात दिली.
27 रुग्णांवर उपचार सुरू
बीड जिल्ह्यात 56 बाधितांवर उपचार केले जात होते. त्यातील 29 जण कोरोनामुक्त झाल्याने आता 27 जणांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यात 24 जण बीड कोव्हीड हॉस्पिटलमध्ये तर 2 जणांवर परतीच्या कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये उपचार सुरू असून अन्य 1 जण केज येथील कोव्हीड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहे. यात बीडमध्ये उपचार घेणारे 3 रुग्ण जोखमीचे आहेत.
तालुकानिहाय कोरोनामुक्त
बीड- 5
आष्टी-1
पाटोदा-2
गेवराई-2
माजलगाव-15
धारूर-2
केज-2
एकूण-29
Leave a comment