बीड । वार्ताहर
परळी येथील तहसील कार्यालयात फेरफार नकलेवरून नायब तहसीलदार बाबूराव रूपनर यांना चार युवकांकडून दारू पिऊन मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी लिपिक सूरज शिंदे यांच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा धनगर समाज युवा मल्हार सेना तीव्र निषेध करत असून कर्मचार्यावरील अन्याय सहन करणार नाही असे संघटनेचे प्रकाश सोनसळे, मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांनी म्हटले आहे.
गुरुवारी (दि.28) दुपारी चारच्या सुमारास येथील तहसील कार्यालयात तहसीलदार यांच्या दालना समोर बेलंबा येथील युवक गोंधळ घालत होते.नायब तहसीलदार बाबूराव रूपनर आपल्या दालनातून बाहेर आले. त्यांनी या युवकांना विचारले असता आमच्या आताच्या आता आमच्या फेरफारची नक्कल पाहिजे आहे आणि तुम्ही आम्हाला विचारणारे कोण? असे म्हणत नशेतील चार युवकांनी रुपनर यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. चष्मा फुटला, शर्ट फाडले. रूपनर हे दिव्यांग आहेत. तहसीलमधील कर्मचारी व इतर नागरिकांनी सोडवा सोडव केल्याने पुढील अनर्थ टळला. तहसील कार्यालयातील कर्मचार्यांनी पोलीस ठाण्यात फोन केल्याने पोलिसांनी तत्काळ तहसीलमध्ये येऊन तीन युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
Leave a comment