शेतकरी, सर्वसामान्यांना मोठा दिलासा
बीड | वार्ताहर
केज तालुक्यातील सोनेसांगवी, मांगवडगांव, माळेगांव, लाखा, भोपळा, हादगाव, सुर्डी व बोरगांव या गावांचा परिसर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बफर झोन रद्द केला आहे. या ठिकाणी लागू केलेली पूर्ण संचारबंदी हटवण्यात आली आहे.शनिवारी (दि.30)हा आदेश जारी करण्यात आला. या आदेशाचे परिसरातील शेतकरी व सर्वसामान्यांनी स्वागत केले आहे.शेतीची अडकलेली कामे आता मार्गी लागणार आहे. हा बफर झोन कधी रद्द होतो याकडे आठही गावातील ग्रामस्थांचे लक्ष लागले होते.
उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंबमध्ये कोरोनाचे बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर इतरत्र प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कळंबपासून ७ कि.मी. परिसरातील केज तालुक्यातील मो. सोनेसांगवी, मांगवडगांव, माळेगांव, लाखा, भोपळा, हादगाव, सुर्डी व बोरगांव या गावांचा परिसर बफर झोन म्हणून घोषित करत अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्यात आली होती.
दरम्यान रुग्ण आढळून आल्यानंतर 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला असून तिथे एकही रुग्ण आढलून आलेला नाही. त्यामुळे या परिसरातील प्रतिबंधात्मक व्यवस्था शिथील करण्यात यावी याबाबतचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिशन पवार यांनी जिल्हाधिकारी यांना सादर केला.त्यानंतर आठ गावातील संचारबंदी मागे घेण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सुधारित आदेशातून कळवले आहे.
Leave a comment