नवी दिल्ली :-
वंदे भारत मिशन अंतर्गत रशियाची राजधानी मॉस्कोला निघालेल्या एअर इंडियात नाटकीय घडामोडी घडल्या आहेत. मॉस्कोला विमान घेऊन निघालेल्या पायलटचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे विमान अर्ध्या मार्गातून परत फिरवण्यात आलं. दिल्ली विमानतळावर या विमानाचं आता निर्जंतुकीकरण केलं जात आहे. आता हे विमान मॉस्कोला कधी निघणार याविषयीची माहिती अजून देण्यात आलेली नाही.
शनिवारी सकाळी मॉस्कोसाठी निघालेलं हे विमान उझबेकिस्तानपर्यंत पोहोचलं होतं. जाण्यापूर्वी क्रू मेंबर्सची करोना चाचणी करण्यात आली होती, ज्यापैकी वैमानिकाची चाचणी पॉझिटिव्ह आली. दरम्यान, विमान उड्डाण होण्यापूर्वी क्रू मेंबर्सची चाचणी निगेटिव्ह आहे असं चुकून वाचण्यात गेल्याची माहिती आहे. पण नंतर ही चूक लक्षात आली आणि विमान परत बोलवावं लागलं.
एअर इंडियाचं ए-३२० निओ हे विमान दिल्ली विमानतळावर १२.३० वाजता दाखल झालं. आता सर्व क्रू मेंबर्सला नियमानुसार १४ दिवस कॉरेंटाईन रहावं लागणार आहे. आता याऐवजी दुसरं विमान एअर इंडियाकडून मॉस्कोला पाठवलं जाणार असल्याची माहिती आहे. मॉस्कोमध्ये अडकलेल्या भारतीयांना या विमानातून परत आणलं जाणार आहे.
क्रू मेंबर्सच्या मोठ्या प्रमाणात चाचण्या केल्या जात आहेत, आणि यामुळेच ही एक नजरचूक झाली. एकट्या दिल्लीतच दररोज ३०० क्रू मेंबर्सची करोना चाचणी होत आहे, ज्यामुळे विविध लॅबचे रिपोर्ट येत असतात. एका एक्सेल शीटमध्ये चाचण्यांचे रिपोर्ट येतात. या चाचण्यांचे रिपोर्ट पाहणारी व्यक्ती निगेटिव्ह आहे, त्यामुळे दिल्ली-मॉस्को विमानासाठी लागणाऱ्या तयारीमध्ये सहभागी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मॉस्कोला निघालेल्या विमानामध्ये एकाही प्रवाशाचा समावेश नव्हता. विमानाने उड्डाण केल्यानंतर दोन तासातच हा प्रकार समोर आला. एका दुसऱ्या व्यक्तीने पुन्हा एकदा क्रू मेंबर्सच्या चाचणी अहवालांवर नजर मारली असता ही चूक लक्षात आली. यानंतर एअर इंडियाने चालढकल करण्याऐवजी मोठा निर्णय घेत विमान परत बोलावलं. हे विमान उझबेकिस्तानपर्यंत पोहोचलं होतं.
वंदे भारत मिशन अंतर्गत एअर इंडिया शेकडो विमाने चालवत आहे. या विमानात काम करणाऱ्या प्रत्येक क्रू मेंबरची चाचणी सरकारने अनिवार्य केली आहे. एअर इंडियाचे कर्मचारी विना भत्ता त्यांचं राष्ट्रीय कर्तव्य निभावत आहेत. कारण, मार्च २०२० पासून त्यांना भत्ते मिळालेले नाहीत. (संग्रहित फोटो )
Leave a comment