बीड । वार्ताहर
संचारबंदीमुळे दोन आठवड्यांपासून दारुची दुकाने लॉक असल्याने तळीरामांची मोठी पंचाईत झाली आहे. वडवणी येथे दारुची तल्लफ भागविण्यासाठी चोरट्यांनी चक्क दुकान फोडले. ही घटना सोमवारी (दि.6) रात्री घडली.
वडवणी येथे चिंचवण रोडवर एक देशी दारुचे दुकान आहे. तेथे तुकाराम भगवान तांबे हे व्यवस्थापक आहेत. संचारबंदीमुळे दारुचे दुकान बंद आहे. त्यामुळे दारुडे बेचैन आहेत. 6 रोजी रात्री दारु दुकानाच्या मागील बाजूच्या फटीतून चोरट्यांनी 7 हजार 488 रुपयांचे तीन बॉक्स लंपास केले. दुसर्या दिवशी हा सर्व प्रकार समोर आला. व्यवस्थापक तांबे यांच्या फिर्यादीवरुन वडवणी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला असून हवालदार चंद्रकांत माळी तपास करत आहेत. चोरट्याने दारुच्या बाटल्या चोरण्यासाठी लहान मुलाचा वापर केल्याचा संशय आहे. मागील दरवाजा उघडलेला नाही. सांदीतून मुलाला आत सोडून त्याच्याकरवी दारुच्या बाटल्या लांबविल्या असाव्यात, असा पोलिसांचा कयास आहे.तपास सुरु असल्याचे सहायक निरीक्षक महेश टाक यांनी सांगितले.
---
Leave a comment