विलगीकरण कक्ष व कोविड १९ कक्षात सुविधा उपलब्ध
केज । वार्ताहर
केज दि.२९ (प्रतिनिधी) जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय व अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्याल्यावरील ताण कमी करण्यासाठी जिल्ह्यात एकूण ११ कोव्हीड सेंटरची उभारणी करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने केज तालुक्यातील पिसेगाव रस्त्यावर असणाऱ्या शासकीय इमारतीत कोव्हीड केअर सेंटरची उभारणी करण्यात येत असल्याची माहिती केअर सेंटर प्रमुख डॉ. नंदकुमार नेहरकर यांनी दिली.
केज तालुक्यातील पिसेगाव रस्त्यावर असलेल्या इमारतीत काही दिवसांपसून विलगिकरण कक्षाची स्थापना केली होती. मात्र जिल्ह्यात कोरोना रुग्णांची होत असलेली वाढ लक्षात घेता जिल्ह्यात जिल्हा रुग्णालय व अंबाजोगाई एसआरटी वगळता इतर ११ केअर सेंटर उभारण्यात येत आहेत. त्यानुसार केज येथे केअर सेंटर उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे. यामध्ये ज्या रुग्णांचे लक्षणे दिसून येत नाहीत अश्या रुग्णांवर उपचार करण्यात येणार असल्याची माहिती डॉ.नेहरकर यांनी दिली. सदरील ठिकाणी ५० बेड्स ची सोय करण्यात येणार आहे. सध्या डॉ.नेहरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील इमारतीचे निर्जंतुकीकरण तसेच स्वच्छतेचे काम करण्यात आले असून पाणी फिल्टर व इतर सुविधा तातडीने उभ्या करण्यात आल्या असून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, उपजिल्हा रुग्णालय केज येथील अधिक्षक डॉ. अरूणा दहीफळे(केंद्रे) यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.नंदकुमार नेहरकर हे स्वतः उपस्थित राहून हे सर्व कर्तव्य पार पाडत आहेत.
Leave a comment