मुंबई । वार्ताहर
देशासह राज्यावर ओढावलेले कोरोनाचे दुष्टचक्र अद्यापही कायम आहे, त्याचबरोबर हा रोग संसर्गजन्य असल्यामुळे राज्य सरकारच्या वतीने गर्दी टाळून व्यवहार सुरळीत करण्याचे आवाहन वारंवार करण्यात येत असल्यामुळे यंदाच्या वर्षी शाळा सुरू होणार की नाही, असा प्रश्न देखील काही दिवसांपासून पालकांच्या मनात घोळत होता. अखेर वर्ग न भरवता शाळा सुरू करण्याच्या दिशेने राज्य सरकारने काम सुरू केले आहे. दूरदर्शन आणि रेडिओच्या माध्यमातून आगामी शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जाणार आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारकडे त्यासंदर्भात दूरदर्शनचे १२ तास, तर रेडिओच्या दोन तासाची वेळ देण्याची मागणी केली आहे.
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाला यासंदर्भातील पत्र राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पाठवले आहे. डिजिटल शिक्षणाच्या दृष्टीकोनातून राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने प्राथमिक ते माध्यमिक वर्गासाठी एक हजाराहून अधिक तासांची डिजिटल शिक्षण साहित्य संग्रहित केल्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षात दूरदर्शनच्या दोन वाहिन्यांवरून दररोज १२ तास, तर ऑल इंडिया रेडिओवरून दोन तास शैक्षणिक अभ्यासक्रमाचे प्रसारण करण्याची राज्य सरकारची तयारी असल्याचे वर्षा गायकवाड यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार याबाबत बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या, दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिन्यांवरून शिक्षणासंदर्भातील प्रसारण केल्यास गाव खेड्यातील मुलांना शिक्षण घेत येईल आणि त्यांच्यासाठी हे खूप सोयीस्कर होईल. स्मार्टफोन किंवा विशिष्ट प्रणाली ऑनलाईन वर्ग घेण्यासाठी असणे आवश्यक ठरते. त्याचबरोबर त्यासाठी चांगली इंटरनेट सुविधाही लागते. त्यासाठी खर्च करावा लागतो. ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थी गरीब घरातून येतात. त्यामुळे त्यांना या गोष्टी करणे शक्य नसल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याचे शिक्षण कोणताही खंड न पडता सुरू राहावे, असा राज्य सरकारचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.
Leave a comment