पंकजाताई मुंडेंचे आवाहन
बीड । वार्ताहर
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीला मुंडे साहेबांच्या आवडीचा पदार्थ करायचा आणि घरातच फोटोसमोर दोन दिवे लावून त्यांना अभिवादन करायचं, असं आवाहन पंकजाताई मुंडे यांनी केलं आहे. 3 जून रोजी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम गोपीनाथ गडावरच होईल, मात्र कार्यक्रम लाईव्ह असेल,कोणीही गडावर गर्दी करु नये, अशी सूचना पंकजाताई मुंडे यांनी केली आहे. 3 जून हा दिवस उजाडलाच नाही पाहिजे, असं वाटत असल्याची फेसबुक पोस्ट पंकजाताई मुंडे यांनी केली आहे.
3 जून रोजी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा सहावा पुण्यस्मरण दिवस आहे. हा दिवस ‘संघर्ष दिन’ म्हणून मुंडे समर्थक साजरा करतात. परंतु सध्या कोरोनामुळे राज्यासह बीड जिल्ह्यातही लॉकडाऊन आहे. शिवाय गर्दीच्या सर्वच कार्यक्रमावर बंदी आहे. गोपीनाथ गडावर सध्या पद्धतीने मोजक्या लोकांमध्ये गोपीनाथराव मुंडे यांची पुण्यतिथी कार्यक्रम होणार आहे. पुण्यतिथीचा कार्यक्रम सोशल मीडियाद्वारे लाईव्ह होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी दर्शन घेण्यासाठी किंवा मला भेटण्यासाठी येऊ नये, असा संदेश पंकजाताई मुंडे यांनी दिला.2 जून रोजी बाबा घरी पोटभर रस-पोळी खाऊन गेले होते. स्वतःच्या घरी तेच त्यांचं अखेरचं जेवण...3 जून रोजी त्यांचे पार्थिव देखील घरी आणता आले नाही. त्यामुळे 3 जून हा दिवस उजाडलाच नाही पाहिजे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
पुण्यतिथी दिवशी हे करा
3 जून रोजी नागरिकांनी आपापल्या घरात मुंडे साहेबांचा फोटो समोर उभे रहा. उजव्या बाजूला घरातील महिला, तर डाव्या बाजूला पुरुष उभे राहतील. आजी, सून, नात उजवीकडे तर आजोबा, मुलगा,नातू डावीकडे असं उभा राहून दोन समई किंवा दिवे लावून अभिवादन करा. मुंडे साहेबांच्या आवडीचा पदार्थ करा, तो काय हे मी सांगायची गरज नाही.हे दोन दिवे लावण्यास मी सांगितले ते स्त्री आणि पुरुष समानतेचा संदेश देणारे आणि समानता जगणारे म्हणून लावायचे असंही पंकजाताई मुंडे यांनी सांगितलं. दुपारी 12 ते संध्याकाळी 6 या वेळेत अन्नदान, रक्तदान, मास्क किंवा औषधाचे वाटप करा, त्याचे फोटो माझ्या सोशल मीडियावर पाठवा,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वतःला जपा, गर्दी करू नका, घरात रहा, तुमच्या जीवाची काळजी साहेबांच्या एवढीच मला आहे, कराल ना मग एवढं? मुंडे साहेबांच्या पुण्यतिथीच्या दिवशी..असं आवाहनही त्यांनी केले आहे.
Leave a comment