बीड | वार्ताहर
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बीड शहरात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. मात्र नागरिकांना घराबाहेर पडून अत्यावश्यक सामानांची खरेदी करणेस अडचण निर्माण होऊ लागल्याने आता जिल्हा प्रशासनाने बीड शहरात संचारबंदी काळात काही बाबींना शिथीलता दिली आहे. आता बीड शहरात फिरून दुध विक्री करता येणार आहे. शिवाय भाजीपालाही घरोघर जाऊन विक्री करता येणार आहे.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जारी केलेल्या सुधारित आदेशानुसार, बीड शहरात फक्त फिरत्या दूध विक्रेत्यांना परवानगी राहील. मात्र कोणत्याही दुकानदारामार्फत दुध विक्री केली जाणार नाही किंवा दुकान उघडणार नाही. दुधांची पाकीटांची होम डिलेव्हरी करावी व ती करत असतांना कोवीड-१९ च्या अनुषंगाने सामाजिक अंतराचे पालन करावे.
परवानाधारक भाजी व फळ विक्रेते यांना पूर्वीप्रमाणे परवानगी राहील, परंतु त्यांनी घरोघरी जावूनच विक्री करावी. घरगूती गॅस घरपोच सेवा देताना गॅस कंपनीचा गणवेश परिधान करावा व त्यांचे गणवेश नसलेले कर्मचारी यांनी नियमानूसार पास काढून सेवा द्यावी. मोबाईल कंपनी ऑपरेटर्स यांच्या कर्मचाऱ्यांनी नियमानुसार पास काढून सेवा द्यावी. वैद्यकीय कर्मचारी व औषधी विक्रेते यांनी दवाखान्याचे ओळखपत्र अथवा ऑनलाईन पासद्वारे बीड शहरांतर्गत प्रवासास परवानगी देण्यात येत आहे.
सर्वांनी सामाजिक अंतर कटाक्षाने पाळावे आणि कोवीड विषयक सर्व नियमांचे पालन करावे असे आवाहनही या आदेशातून जिल्हा प्रशासनाने केले आहे.
जारचे पाणी देताना अशी घ्या काळजी
जार वॉटर सप्लायर्स करणाऱ्यांनी पाणी जारद्वारे वाटप न करता ग्राहकाकडील उपलब्ध भांड्यामध्ये पाणी द्यावे आणि त्यावेळेस कोवीड-१९ च्या अनुषंगाने सामाजिक अंतराचे पालन करावे किंवा जार वाटर सप्लायर्स यांनी संपूर्ण जार ग्राहकास द्यावे.रिकामी जार परत न घेता त्याच जारमध्ये पुनर्भरणाची घरपोच सेवा द्यावी. तसेच सर्व वॉटर सप्लायर्स कर्मचारी यांनी नियमानूसार पास काढून घेऊन सेवा पुरवावी असे जिल्हाधिकारी यांनी या आदेशात नमूद केले आहे.
Leave a comment