मुंबई । वार्ताहर
महाविकासआघाडीने देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यानंतर आता या पत्रकार परिषदेवर देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला आहे. हे सरकार खोटं बोल पण रेटून बोल करत आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे.
देशातील ३३ टक्के कोविड रुग्ण महाराष्ट्रात आहेत. ४० टक्के कोविड मृत्यू हे महाराष्ट्रात झाले आहेत, पण हे मंत्री स्वत:ची पाठ थोपटून घेत आहेत. देशात कोविडच्या जेवढ्या टेस्ट केल्या त्यामध्ये ५ टक्के पॉझिटिव्ह रुग्ण निघत आहेत. राज्यात ही टक्केवारी १३ टक्के तर मुंबईत त्यापेक्षा जास्त आहे. मुंबईत कोविड टेस्टची संख्या कमी करण्यात आली आहे. अजूनही मुंबईत एम्ब्यूलन्स मिळत नाही. रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतले जात नाहीत, त्यावर राज्य सरकार काहीच बोलत नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली.
मी घेतलेल्या पत्रकार परिषदेमधील आरोपांवर एवढ्या बैठका घेतल्या, अशा बैठका जर इतर वेळी घेतल्या असत्या, तर महाराष्ट्राचं भलं झालं असतं. खरं तर सत्य बोलायला एकच माणसू लागतो, पण फेकफाक करायला ३ माणसं लागतात, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.
२ किंवा ३ रुपये दराने दिला जाणारा गहू हा अन्न सुरक्षा योजनेचा केंद्र सरकारनेच दिलेला गहू आहे, मग तो कुठे आहे हा प्रश्न कसा पडला? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. राज्याला केंद्र सरकारने ९ लाख ८८ हजार पीपीई किट्स, १६ लाख एन-९५ मास्क दिले आहेत, असा दावा फडणवीस यांनी केला आहे. महाविकासआघाडीच्या मंत्र्यांनी मात्र मास्क कमी प्रमाणात मिळाल्याचा आरोप केला.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केंद्राने राज्य सरकारला आतापर्यंत किती, कोणत्या प्रकारे मदत केली याचा लेखाजोगा मांडला. मात्र फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे मदत राज्याला मिळाली नसून फडणवीस केवळ मोठंमोठे आकडे सांगून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप आघाडी सरकारकडून करण्यात आला. यासाठी जयंत पाटील, बाळासाहेब थोरात आणि अनिल परब या मंत्र्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
Leave a comment