जिल्ह्यातील उपचार घेणार्या बाधितांची संख्या 47
बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यात 24 तासात कोरोनाचे 8 रुग्ण वाढल्याने चिंतेचे वातावरण आहे. सोमवारी जिल्ह्यात 57 पैकी 50 व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. प्रलंबित 7 रिपोर्ट मंगळवारी (दि.26) दुपारी जिल्हा रुग्णालय प्रशासनाला प्राप्त झाले. यातील 5 अहवालांचा कोणताही निष्कर्ष निघाला नाही तर 2 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. मंगळवारी सकाळी पाठवलेल्या 30 अहवालांपैकी 6 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आता बीड जिल्ह्यात उपचार घेणार्या एकूण रुग्णांची संख्या 47 झाली आहे. आठ पैकी बाधीत 2 रुग्ण मुबंई येथून आले होते, शहरातील जुना धानोरा रोड, दिलीपनगर येथील ते राहिवासी आहेत अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
कोरोना रूग्णाच्या संपर्कात आलेले आणि या आजाराची लक्षणे दिसणार्या 55 जणांचे स्वॅब सोमवारी तपासणीसाठी लातूरच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. यामध्ये बीड जिल्हा रूग्णालयातून 34, गेवराई 3, माजलगाव 15, आष्टी 3 अशा एकूण 55 रूग्णांच्या स्वॅबचा समावेश होता. तर अन्य ठिकाणावरून 2 जणांचे असे 57 नमुने तपासणीसाठी पाठवले होते. यातील 50 जणांचे स्वब रिपोर्ट सोमवारी निगेटिव्ह आले होते तर 7 जणांचे अहवाल प्रलंबित होते. मंगळवारी ते प्राप्त झाले असून 2 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह तर पाच अहवालाचा कोणताही निष्कर्ष निघालेला नाही. दरम्यान मंगळवारी सकाळी पाठवण्यात आलेल्या एकुण 30 स्वॅबपैकी 6 व्यक्तींचे स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आले असून 22 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 2 अहवाल प्रलंबित आहेत. 24 तासात बीड जिल्ह्यात कोरोनाचे 8 रुग्ण वाढल्याने जिल्ह्यात चिंतेचे वातावरण आहे.
बीडमधील बाधीत दोघे एकाच कुटूंबातील
बीडमधील दोन कोरोना पॉझिटिव्ह मुंबईतील नरसीपाडा भागातून गत दोन दिवसांपूर्वी शहरात आले होते. त्यानंतर ते जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. एकूण 3 जणांचे कुटूंब होते. यात 36 वर्षीय पुरुष तर 12 वर्षीय मुलगी बाधित आली असून महिलेच्या स्वॅबचा निष्कर्ष निघालेला नाही असे असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
सहा बाधित परळी,पाटोदा, शिरुर तालुक्यातील
बीड जिल्ह्यात मंगळवारी पाठवलेल्या स्वॅबपैकी पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेले 6 रुग्ण हे पाटोदा, परळी, आणि शिरुर तालुक्यातील असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. यातील 2 बाधित हाळंब (ता.परळी), बारगजरवाडी (ता.शिरुर) येथील 2 तर कारेगाव व वाहली (ता.पाटोदा) या गावातील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे.
Leave a comment