नांदेड । वार्ताहर
पालकमंत्री तथा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी, ते लवकरात लवकर कोरोना मुक्त व्हावेत, अशी सदिच्छा व्यक्त करतानाच खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पालकमंत्री अशोकराव चव्हाण उपचारासाठी मुंबईला गेले आहेत त्यामुळे अशोकरावांचा नांदेड च्या आरोग्य सेवेवर विश्वास नाही का असा प्रश्न सर्व सामान्य जनतेला पडला आहे असे मत खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त आहे.
महाराष्ट्राचे दोन वेळा मुख्यमंत्री पद भूषविणारे अशोकराव चव्हाण हे राज्याच्या सत्तेच्या राजकारणात अनेक वर्षापासून कार्यरत आहेत. परिवहन मंत्री, महसूल मंत्री, सांस्कृतिक मंत्री यासह सार्वजनिक बांधकाम मंत्री व अशा विविध महत्त्वपूर्ण खात्याचे मंत्रिपद भूषविले आहेत. त्यामुळे अशोकराव चव्हाण यांचा नांदेडच्या राजकारणात आणि राज्याच्या राजकारणातही सक्रिय सहभाग राहिला आहे. इतकी वर्षे राज्याच्या सत्तेत राहिल्यानंतरही नांदेडला जी आरोग्यसेवा आवश्यक आहे ती आरोग्यसेवा आतापर्यंतही उभारण्यात त्यांना यश आले नाही हे अशोकराव चव्हाण उपचारासाठी मुंबईला गेल्यानंतर सिद्ध झाले. इतक्या वर्षाच्या सत्तेच्या काळात नांदेडमध्ये मुंबई, पुण्याच्या धर्तीवर आरोग्य सेवा निर्माण कारणे आवश्यक होते.परंतु चव्हाणांना ते आतापर्यंत जमले नाही हे ते उपचार घेण्यासाठी मुंबईला गेल्यानंतर सिद्ध झाले आहे. खरे तर नांदेडच्या आणि काँग्रेसच्या राजकारणात अशोकराव यांची नितांत गरज आहे .त्यामुळे त्यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारली पाहिजे अशी आपली सदिच्छा आहे. परंतु गेल्या अनेक वर्षाच्या राजकारणात ते सत्तेत सहभागी असतानाही नांदेडला योग्य आरोग्यसेवा उभारता आली नाही हेच यातून दिसून येते. वास्तविक नांदेड शहरामध्ये 50हून अधिक कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. शासकीय रुग्णालयातील आरोग्य सेवा, आरोग्य यंत्रणा योग्य रीतीने काम करत असल्यानेच ते रुग्ण बरे झाले आहेत . त्यामुळे नांदेड च्या आरोग्य सेवेत उपचार न घेता पालकमंत्री मुंबईला उपचार घेण्यासाठी जाणे हे येथील आरोग्य विभागावर, त्यांच्या कामावर अविश्वास दाखवण्यासारखे आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची मानसिक खच्चीकरण करणारी ही बाब आहे. शिवाय जे गोरगरीब कोरोणा बाधित रुग्ण आहेत त्यांच्या मनात भीती निर्माण करणारा हा प्रकार आहे.
अशोकराव चव्हाण यांच्यावर नांदेड मध्ये जर उपचार करण्यात आले असते किंवा त्यांनी येथेच उपचार येथे घेतले असते तर नांदेडच्या आरोग्य सेवेवर नांदेड जिल्ह्यातील लोकांचा, कोरोना रुग्णांचा आणि महाराष्ट्रातील एकूण आरोग्य यंत्रणेचा ही मोठा विश्वास निर्माण झाला असता. दुर्दैवाने नांदेडच्या आरोग्य यंत्रणेला ही संधी मिळाली नाही त्यामुळे अशोकराव चव्हाण यांचा आरोग्य विभागावर त्यांच्या आरोग्य सेवेवर विश्वास नाही काय ? असा प्रश्न सर्वसामान्यांनाही पडला आहे असे मतही खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केले.
प्रशासकीय यंत्रणा पोलिस यंत्रणा आरोग्य यंत्रणा एवढ्या चांगल्या पद्धतीने काम करत असताना स्वतः पालकमंत्री यांनी यांचेवर गैरविश्वास करावा ही बाब जिल्ह्यातील अनेकांना खटकली आहे. त्या बरोबर जे 133 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहे. त्यांच्या मनात आरोग्य विभागाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. प्रशासनाने जेवढे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले त्यांनाही मुंबईला घेऊन जायला पाहिजे. प्रशासनाने कोरोना संदर्भात तरी दुजाभाव करू नये, असे मत जनता व्यक्त करत आहे.
अशोकराव लवकरात लवकर कोरोणा मुक्त व्हावेत, नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात ते लवकरच परत येतील परंतु दुरुस्त होऊन आल्यानंतर तरी नांदेड शहर, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी व लोकांचा या आरोग्य विभागावर विश्वास बसण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा असे मतही खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केला.
Leave a comment