मुंबई । वार्ताहर
कोरोना विषाणूने मुंबईमध्ये कहर माजवला असून मुंबई महानगरपालिका आणि राज्यसरकारच्या आवाक्याबाहेर परिस्थिती गेली की काय? असे एकंदरीत चित्र आहे. मुंबईमध्ये मृतदेह ठेवायलाही जागा नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. केईएम रूग्णालयाच्या शवागृहामध्ये जागा नसल्याने शवागृहाशेजारी असलेल्या कॉरीडोरमध्ये अनेक मृतदेह ठेवल्याचे निदर्शनास आले आहे. हे मृतदेह ठेवल्याचे हे चित्र अनेकांना धक्का देणारे ठरले आहे.
कोरोनाचे संकट दिवसागणिक वाढत आहे. मुंबईतील कोरोनाचा गुणाकार हा कमी झाला असला तरी रुग्ण संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईत कोरोनाची स्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मुंबईतील महत्वाच्या रुग्णालयांपैकी केईएम रुग्णालय आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्ण येत असतात. येथे कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. येथे कोरोनाच्या विषाणूमुळे मृत्यू झालेल्यांची संख्याही जास्त असल्याचे दिसून येत आहे. 27 मृतदेह ठेवण्याची शवागृहाची क्षमता संपल्याने 10 मृतदेह कॉरीडोरमध्ये ठेवण्याची वेळ मुंबई पालिकेच्या रुग्णालय प्रशासनावर आली आहे.
Leave a comment