बीड । वार्ताहर
पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन तिच्यासह पोटच्या दोन मुलांना संपविणार्या आरोपीला सोमवारी (दि.25) न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. रविवारी (दि.24) पहाटे शहरातील पेठ बीड भागात घडलेल्या या तिहेरी हत्याकांडाने शहर हादरुन गेले होते.पतीच्या या क्रुर कृत्याने संपूर्ण कुटूंब उध्वस्थ झाले आहे.
संगीता संतोष कोकणे (35), सिध्देश संतोष कोकणे (10) व कल्पेश संतोष कोकणे (8) यांचा मृतांत समावेश आहे. शहरातील पेठ बीडमधील शुक्रवार पेठेतील तकवा कॉलनीत राहणार्या या कुटुंबात पती- पत्नीत अनेक दिवसांपासून वाद सुरु होता. संगीताच्या चारित्र्यावर संतोष सतत संशय घेत होता. घटनेच्या आधी तीन दिवसांपूर्वीच पत्नीविरुध्द संतोषने पेठ बीड पोलिसांत अदखलपात्र गुन्हा नोंद केला होता. शनिवारी पत्नीसोबत याच कारणावरुन त्याचा पुन्हा एकदा वाद झाला होता. त्यानंतर रात्री तो मोठा मुलगा मयुरेश (15) यास सोबत घेऊन पेठ बीडमधील माऊली चौकात राहणार्या बहिणीकडे गेला होता. रविवारी पहाटे घरी येऊन त्याने साखरझोपेत असलेल्या पत्नी संगीता, सिध्देश व कल्पेश या दोन मुलांच्या डोक्यात बॅट मारली. त्यानंतर पत्नीच्या डोक्यात दगड मारुन त्याने तिला संपविले. बॅटच्या फटक्यात दोन्ही मुले जागीच गतप्राण झाले होते. एवढ्यावरच न थांबता त्याने लहान मुलगा कल्पेशला उचलून घरातील पाण्याच्या टाकीत फेकून तेथून पुन्हा बहिणीचे घर गाठले होते. या घटनेला पती- पत्नीतील कलहाची किनार असावी, हा पोलिसांचा संशय तपासात खरा ठरला. संतोष जयदत्त कोकणेला पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यास सोमवारी न्यायालयात हजर केले तेंव्हा न्यायालयाने त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली, अशी माहिती निरीक्षक विश्वास पाटील यांनी दिली.
पत्नीची बाजू घेतात म्हणून दोन मुलांनाही संपवले
कोकणे दाम्पत्यात सतत वाद होत होते. मोठा मुलगा मयुरेशने पित्याची तर लहान मुलगा कल्पेश व मधला मुलगा सिध्देश या दोघांनी आईची साथ दिली होती. संगीताने जेंव्हा संतोषला मारहाण केली होती, तेंव्हा कल्पेश व सिध्देश तिच्यासोबत होते. त्या दोघांना आईची ओढ होती. ते दोघे आईचीच बाजू घेत होते, त्यामुळे त्यांना संपविल्याची कबुली संतोष कोकणे याने पोलिसांना दिलेल्या जवाबात दिली.
उत्तरीय तपासणी 24 तासानंतर; परिसर सून्न
तिहेरी हत्याकांडाची ही घटना समोर आल्यानंतर पेठ बीठ पोलीसांनी तातडीने या प्रकरणाचा उलगडा झाला. मात्र घटनास्थळ पंचनामा, गुन्हा नोंदविण्यासह इतर बाबींची प्रक्रिया पूर्ण करण्यास उशीर झाला. त्यामुळे सोमवारी सकाळी 10 वाजेनंतर उत्तरीय तपासणी करुन तिघांचेही मृतदेह माहेरच्या मंडळींकडे देण्यात आले. संगीतासह तिच्या दोन मुलांच्या खुनाने माहेरील नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. मृृतदेह ताब्यात घेताना अश्रू अन् हुंदक्यांनी परिसर सून्न झाला होता.
पाच नातेवाईकांच्या उपस्थितीत माय-लेकरांवर अंत्यसंस्कार
मयत संगीता कोकणेचे माहेर सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात आहे. संगीतासह सिध्देश व कल्पेश या दोन मुलांच्या खुनाच्या घटनेची माहिती कळाल्यावर रविवारीच माहेरचे पाच नातेवाईक बीडमध्ये दाखल झाले. सोमवारी दुपारी शहरातील अमरधाम स्मशानभूमीत तिघा माय-लेकरांवर स्वतंत्र चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिसांचा बंदोबस्तही तैनात होता.
Leave a comment