मुंबई । वार्ताहर
राज्यात कोरोनामुळे एसटी महामंडळाची सेवा सुमारे दोन महिन्यांपासून बंद आहे. त्यानंतर आता एसटीने २२ मेपासून राज्यातील जिल्ह्यांच्या अंतर्गत सेवा सुरू केल्या आहेत. पहिल्याच दिवशी ४५७ गाड्यांमार्फत निवडक मार्गांवर २००७ फेऱ्या धावल्या आहेत; मात्र यामध्ये प्रत्येक एसटी डेपोमध्ये उत्पन्नापेक्षा डिझेल आणि नियोजनाचा खर्चच जास्त झाल्याचे दिसून येत आहे.
एसटी महामंडळाचा सहा हजार कोटींपेक्षा जास्त संचित तोटा झाल्याचा दावा एसटी महामंडळाकडून वेळोवेळी केला जात आहे. त्यात खिळखिळ्या एसटी आणि अपघाती शिवशाहीमुळे एसटीच्या प्रवासी संख्येत घट झाली आहे. अशातच गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने एसटी सेवा बंद आहे. त्यामुळे निव्वळ प्रवासी उत्पन्नावर अवलंबून असलेल्या एसटी महामंडळाच्या तिजोरीत खडखडाट आहे.
दोन महिन्यांनंतर पुन्हा एकदा एसटी महामंडळाने एसटीची जिल्ह्यांतर्गंत सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला खरा; मात्र प्रवासीच मिळत नसल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये रिकाम्या बस फिरताना दिसून येत आहेत; तर अनेक बस एक ते दोन प्रवाशांसाठी धावताना दिसून येत आहेत. त्यामुळे डिझेल आणि त्याच्या नियोजनाचा खर्च एसटीला उचलावा लागत असताना उत्पन्न मात्र १२५ रुपयांपर्यंत होत असल्याचे अनेक एसटी डेपो प्रशासनाने सोशल माध्यमांवर जाहीर केले आहे.
Leave a comment