नारायण राणेंची राज्यपालांकडे मोठी मागणी
मुंबई । वार्ताहर
राज्याचे माजी मुख्यमंत्री व भाजपचे खासदार नारायण राणे यांनी आज राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यांनी राज्य सरकार अपयशी ठरल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. या मागणीवरून राज्यातले राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.
ठाकरे सरकार कोरोना संकट हाताळू शकत नाही. या सरकारमध्ये कोरोना संकट हाताळण्याची क्षमता नाही. हे सरकार कोरोनाचा सामना करण्यास अपयशी ठरले आहे. राज्य सरकार कोरोना साथीमुळे उद्भवलेली परिस्थिती हाताळण्यातही पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळेच या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नसून राज्यपालांनी या सरकारला नारळ द्यावा व राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी आपण राज्यपालांकडे केल्याचे राणे यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रशासकीय कामकाजाचा अनुभव नसल्याने त्यांना परिस्थिती हाताळता येत असल्याची टीकादेखील त्यांनी केली. राज्यातील जनतेचा जीव वाचवण्यात हे सरकार असमर्थ ठरले आहे. कोरोना साथीशी लढा देत असताना सरकारच्या क्षमता उघड्या पडल्या आहेत. सरकारी यंत्रणा कशी हाताळावी, पोलीस दल कसे हाताळावे, याचा अभ्यास नसल्याने ही स्थिती उद्भवली आहे. राज्याच्या हिताचे कोणतेही निर्णय घेतले जात नाहीत, असे सांगत राणे यांनी पुन्हा एकदा हे स्थगिती सरकार असल्याचा आरोप केला. मुंबईसारख्या शहरात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सर्व रुग्णालये लष्कराच्या ताब्यात द्यायला हवीत, अशी मागणीही राणे यांनी केली.
राज्यात अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. लोकांची उपासमार सुरू आहे. रोजगार नाही, गरिबांना अन्नधान्य मिळत नाही. परीक्षा रद्द होत आहेत. केवळ बंद, बंद आणि स्थगिती, स्थगिती यापलीकडे सरकार काहीच करताना दिसत नाही, असे सांगत राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
अनेक मुद्द्यांवरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये संघर्ष सुरू आहे. त्यावर बोलताना आतापर्यंत राज्याला जे काही मिळाले आहे ते सगळे केंद्रानेच दिले आहे. त्यापलीकडे या सरकारने काय काम केले आहे, असा सवाल राणे यांनी केला. रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी श्रमिक स्पेशल ट्रेनबाबत जी भूमिका घेतली आहे ती योग्यच असल्याचेही राणे म्हणाले. एका तोंडाने राज्य सरकार केंद्राचे कौतुक करते. दुस-या तोंडाने टीका करते. हे कुठल्या प्रकारचे राजकारण आहे हे समजण्यापलिकडे आहे. या सरकारचा अभ्यास नाही, सरकारी अधिका-यांना कसे हाताळावे, त्यांना कोरोना संकटातून कसे वाचवावे, पोलिसांना सुरक्षित कसे ठेवावे याचा अभ्यास नाही, अशा शब्दांत राणेंनी महाआघाडी सरकारला लक्ष्य केले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राजभवनावर राजकीय नेत्यांची वर्दळ वाढली आहे. सरकारविरोधात गा-हाणी घेऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची अनेकदा भेट घेतली. त्यात रविवारी शिवसेना नेते संजय राऊत राज्यपालांचा भेटीसाठी पोहचले. त्यानंतर महाविकास आघाडीचे शिल्पकार व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सकाळी राज्यपालांची भेट घेतली. सुमारे अर्धा तास पवार व राज्यपाल यांच्यात चर्चा झाली. ही केवळ सदिच्छा भेट होती, असे नंतर राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले. त्यापाठोपाठ आता राणे यांनी राज्यपालांची भेट घेतल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा मात्र जोरदार रंगल्या आहेत. भाजपच्या बाकीच्या नेत्यांना टाळून राणे एकटेच राज्यपालांना भेटल्यानेही अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


Leave a comment