मुंबई । वार्ताहर
लॉकडाऊनमुळे अनेक स्थलांतरित विविध राज्यात अडकले आहेत. त्यांना स्वगृही नेण्यासाठी विशेष श्रमिक रेल्वे सोडण्यात आल्या आहेत. मात्र, यावरून आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यात वाद झाला आहे. तर, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या कामाचे कौतुक केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा रंगल्या आहेत.
उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला संबोधित करताना स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नांवर भाष्य करताना चिंता व्यक्त केली. त्याचबरोबर रेल्वे मंत्रालयाकडून मागणीपेक्षा कमी रेल्वेगाड्या सोडण्यात येत असल्याचं सांगत त्यांनी केंद्राकडून होणाऱ्या दिरंगाईवर टीका केली होती. उद्धव ठाकरे यांनी रेल्वेगाड्यांचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर पियूष गोयल यांनी लागलीच उद्धव ठाकरे यांना उत्तर दिले. एका तासात आवश्यक माहिती द्या, तुम्हाला हव्या तितक्या रेल्वेगाड्या उपलब्ध करून देऊ, असं उत्तर रेल्वेमंत्र्यांनी म्हटलं आहे. मात्र, रेल्वेला देशभरात गाड्या चालवायच्या आहेत. त्यांच्यावर इतका भार असूनही चांगलं काम सुरू आहे रेल्वे मंत्रालयाच्या कामाची तारीफ करायला हवी. आजच्या घडीला टीकाटिप्पणी करणे योग्य नसल्याचं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी ही प्रफुल्ल पटेल हे देखील उपस्थित होते. कोणत्याही महत्त्वाच्या राजकीय विषयावर चर्चा झाली नाही. ही सदिच्छा भेट असल्याचं स्पष्टीकरण प्रफुल्ल पटेल यांनी दिलं आहे.
Leave a comment