आरोपी पती ताब्यात; पेठबीडमधील घटनेेने जिल्हा हादरला
बीड । वार्ताहर
चारित्र्यावर संशय घेत साखर झोपेत असलेल्या पत्नीसह दोन मुलांचा पतीनेच खून केला. संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवून देणारी ही रक्तरंजित खूनाची घटना शहरातील शुक्रवार पेठेत रविवारी (दि.24) पहाटे घडली. दुपारी हा प्रकार लक्षात आल्यानंतर दुपारी 3 वाजेच्या सुमारास पेठ बीड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आरोपी पतीस पेठ बीड पोलीसांनी गजाआड केले असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
संगीता संतोष कोकणे (35), सिध्देश संतोष कोकणे (13) आणि बल्लू उर्फ कल्पेश संतोष कोकणे (9,सर्व रा.शुक्रवार पेठ, तकवा कॉलनी बीड) अशी मयतांची नावे आहेत. तर संतोष कोकणे आरोपीचे नाव आहे. पोलीसांच्या माहितीनुसार, संतोष हा बीडमध्ये गोळ्या, बिस्किटे विक्रीसाठी सेल्समन म्हणून काम करतो. त्याचे पत्नी संगीता यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने भांडणे व्हायची. संतोष हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. गत महिन्यात 17 एप्रिलला त्याची पत्नी हरवल्याची तक्रारही पेठ बीड ठाण्यात देण्यात आली होती. त्या प्रकरणात चार दिवसानंतर पेठ बीड पोलीसांनी संगीताचा शोध घेतला. नंतर हे दांम्पत्य सोबत राहत होते. मात्र पत्नीचे अनैतिक संबंध असल्याची कुणकूण संतोषला लागली होती.यातून त्यांचे भांडणही झाले होते.
घटनेच्या पूर्वसंध्येला आरोपी संतोष हा त्याचा मोठा मुलगा मयुरला सोबत घेवून त्याच्या बीडमधील त्याच्या घरापासून जवळच असलेल्या माऊली चौकातील बहिणीच्या घरी झोपण्यासाठी गेला होता. इकडे पत्नी संगीता आणि तिची दोन्ही मुले घरी झोपलेली होती. रविवारी पहाटेच्या सुमारास संतोषने कुणालाही कळू न देता स्वत:चे घर गाठले. डोक्यात बॅट आणि दगड मारुन त्याने साखरझोपेत असलेल्या पत्नीला संपवले, नंतर बाजुलाच झोपलेल्या दोन्ही चिमुकल्या मुलांनाही त्याच पध्दतीने मारुन एकाला पाण्याच्या टाकीत टाकून दिले. संशय येवू नये म्हणून पुन्हा बहिणीच्या घरी जावून झोपला. तिथे त्याच्या बहिणीने त्याला कुठे गेला होतास? याची विचारणाही केली, मात्र झोप लागली नाही म्हणून बाहेर चक्कर मारुन आल्याचे सांगत त्याने खरा प्रकार लपवून ठेवला. पो.नि.विश्वास पाटील अधिक तपास करत आहेत.
दोन दिवसापूर्वीच पत्नी विरोधातच दिली तक्रार
घटनेच्या तीन दिवस अगोदर संतोषने पत्नी संगीताविरुध्द पेठ बीड ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानुसार तिच्यावर अदखलपात्र गुन्हाही नोंदवला गेला होता. याच प्रकरणात तुम्ही पत्नीला पोलीस ठाण्यात का आणत नाहीत याची विचारणा करण्यासाठी संतोष हा शनिवारी (दि.23) संतोष ठाण्यातही आला होता. नंतर रविवारी दुपारीही या गुन्ह्यात पत्नीवर काय कारवाई केली हे विचारण्याचे निमित्त करुन पोलिस ठाण्यात आला. पोलिसांची दिशाभूल करण्याचा त्याचा प्रयत्न होता.
वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी
जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्यासह अप्पर अधीक्षक विजय कबाडे,उपाधीक्षक भास्कर सावंत, गुन्हे शाखा निरीक्षक भारत राऊत, पेठ बीड ठाण्याचे पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. पेठ बीड पोलीसांनी पंचनामा केला. दरम्यान आज सोमवारी आरोपीला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.
बहिणीच्या घरी झोपून पहाटे पत्नीसह मुलांना संपवले
पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचे भूत संचारलेल्या संतोषने पत्नीसह मुलांचाही काटा काढण्याचा कट रचल्याचे पोलीसांच्या तपासादरम्यान समोर आले आहे. नियोजनबध्द पध्दतीने पोलीसांची दिशाभूल करण्याच्या हेतून आरोपी संतोष हा घटनेच्या एक दिवस अगोदर म्हणजे शनिवारी रात्री त्याचा मोठा मुलगा मयुर यास सोबत घेवून बहिणीकडे झोपण्यासाठी गेला होता. तिथून पहाटे त्याने घर गाठून पत्नी आणि दोन्ही मुलांचा निर्घृनतेने खून केला. त्यानंतर तेथून कसलाही पश्चाताप न होवू देता तो पुन्हा बहिणीच्या घरी पोहचला. मुलगा मयुर हा त्याच्या आत्याच्या घरीच झोपल्याने तो वाचला.
पोलीसांनी दिले मुलाला जेवण
रविवारी दुपारी तिहेरी खूनाचा हा प्रकार समोर आल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली. दरम्यान या घटनेतून वाचलेला मयुर कोकणे (15) हा मुलगा पोलीस ठाण्यात बसून होता. त्याला बापाने काय कर्म केले याची सुरुवातीला कसलीही माहिती नव्हती. तो आजारी असतो. सकाळपासून त्याने काहीच खाल्ले नसल्याचे लक्षात आल्यानंतर या प्रकरणात गुंतलेल्या पोलीस कर्मचारी संजय वडमारे व इतरांनी मयुरला अल्पोहार तसेच त्याच्या जेवणाची व्यवस्था केली. दरम्यान वडिलांना पोलिसांनी अटक केली आता त्याला आत्या, चुलत्यांचा आधार उरला आहे.
Leave a comment