कोलकाता -
पश्चिम बंगालमध्ये महाचक्रीवादळ अम्फानमुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हाणी झाली आहे. या महाचक्रीवादळाने आतापर्यंत राज्यातील ८६ जणांचे प्राण घेतले असून वादळात झालेले नुकसान काही लाख कोटींच्या घरात असावे असा अंदाज बांधला जातोय. महाचक्रीवादळाचा फटका बसल्याने राज्याचं मोठं नुकसान झालं असलं तरी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर यांनी अम्फानच्या निमित्ताने का होईना पण एक आशेचा किरण निर्माण होत असल्याचं म्हंटलं आहे.
राज्यपाल धनखर यांच्या मते, 'अम्फान महावादळामुळे पहिल्यांदाच पश्चिम बंगाल सरकार व केंद्र सरकार एकत्रित काम करताना दिसत असून हे घडून येणं राज्यातील जनतेच्या हिताचं आहे.' एका नामांकित वृत्तसंस्थेशी बोलताना धनखर यांनी हे मत व्यक्त केले आहे. यावेळी बोलताना राज्यपाल धनखर यांनी केंद्र सरकारने राज्याला अम्फान महावादळाच्या तडाख्यातून सावरण्यासाठी दिलेली १ हजार कोटींची आर्थिक रसद केवळ पॅकेज नसून ही एक सुरुवात असल्याचंही म्हंटलं आहे.
'गेल्या अनेक वर्षांपासून राज्य व केंद्र सरकार दरम्यान केवळ आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात होत्या. मात्र अम्फान महावादळाचा सामना करताना केंद्र व राज्य सरकारने आपापसातील मतभेद बाजूला सारून एकत्र आल्याचं पाहायला भेटतंय. ही परस्पर सहकार्याची भावना अशीच पाहायला मिळत राहो.' अशी आशाही व्यक्त केली.
असं असलं तरी राज्यपाल जगदीप धनखर यांनी यावेळी राज्य सरकार अम्फान महावादळाचा सामना करण्यामध्ये कमी पडल्याचा देखील दावा केला. याबाबत बोलताना धनखर यांनी, आपण महाचक्रीवादळाच्या संकटाबाबत कोस्ट गार्ड तसेच बीएसएफसोबत विस्तृत संवाद साधला मात्र पश्चिम बंगाल सरकारसोबत कोणताही संवाद होऊ शकला नाही. अशी खंत व्यक्त केली. कोस्ट गार्ड व बीएसएफने या संकटाचा सामना उत्कृष्टरित्या केला मात्र स्थानिक प्रशासनाने योग्य वेळी पावलं उचलली नाहीत. असा सेवा त्यांनी केला.
Leave a comment