कोरोनाने आतापर्यंत घेतले 41 बळी
औरंगाबाद । वार्ताहर
औरंगाबादमध्ये कोरोनाने उच्छाद मांडला असून रूग्णसंख्या कमी होण्याचे नाव घेत नाही. आरोग्य प्रशासन आता हतबल झाले आहे. काल दिवसभरात 51 रूग्ण आढळून आले तर दोघांचा बळी गेला. आतापर्यंत औरंगाबाद जिल्हयामध्ये कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रूग्णांची संख्या 41 झाली आहे तर 1179 रूग्ण कोरोना पॉझीटीव्ह आले आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यात आज दुपारी सहा कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1179 झाली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये औरंगाबाद शहरातील मकसूद कॉलनी, एन-5 सिडको, एन-7 सिडको, पिसादेवी, राम नगर आणि कन्नड तालुक्यातील धनगरवाडी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. यामध्ये दोन पुरुष आणि चार महिला आहेत.
आसेफिया कॉलनी येथे राहणार्या एका 48 वर्षीय व्यक्तीला 19 मे रोजी घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याला दोन्ही फुफ्फुसांचा न्यूमोनिया होता. त्याशिवाय त्याला उच्च रक्तदाबाचाही त्रास होता. त्यातच त्याला करोनाचा संसर्ग झाल्याने उपचार सुरू असतानाच काल बुधवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. काल संध्याकाळी त्याचा स्वॅब रिपोर्ट आला असता त्याला करोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे.
तसेच रेहमानिया कॉलनी येथे राहणार्या एका 65 वर्षीय व्यक्तीला बुधवारी घाटीमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यालाही दोन्ही फुफ्फुसांचा न्यूमोनिया झाला होता. शिवाय त्याला गंभीर श्वसनविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब व हृदयविकाराचाही त्रास होता. अनेक आजार असल्यामुळे उपचार सुरू असताना काल बुधवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. संबंधित रुग्ण हा करोनाबाधित असल्याचे बुधवारी सायंकळी प्राप्त झालेल्या स्वॅब रिपोर्टवरुन स्पष्ट झाले, असे घाटी प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत करोनाबाधितांच्या मृत्युची संख्या 41 झाली आहे. यातील 38 बाधितांचे मृत्यू हे घाटीमध्ये झाले आहे, तर एक मृत्यू जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये व दोन मृत्यू हे शहरातील खासगी रुग्णालयामध्ये झाले आहेत.
Leave a comment