आ.सोळंके, आडसकरांनी शेतकर्यांना झुलवले
बुधवारी एकही नवीन जिनिंग चालूच झाली नाही
माजलगाव । वार्ताहर
लॉकडाऊनमुळे दोन महिन्यापासून शेतकर्यांचा कापूस घरात पडून राहिल्याने मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. पंधरा दिवसापूर्वी शासनाने कापूस खरेदीला सुरुवात केली परंतु तालुक्यात एकच जिनिंग आणि त्यावर फक्त 50 शेतकर्यांचेच मापे होऊ लागली. शेतकर्यांच्या संपूर्ण कापसाच्या खरेदीसाठी आम्ही प्रयत्न केल्याचे सांगून बुधवार पासून मतदारसंघात 6 जिनिंग सुरु होणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध करून आमदार प्रकाश सोळंके, भाजपचे रमेश आडसाकारांनी शेतकर्यांना आशेला लावले; परंतु बुधवारी प्रत्यक्षात एकही जिनिंग चालू झालीच नाही. यामुळे नेत्यांचा हा केवळ प्रसिद्धीचा स्टंट असल्याचे उघड झाले आहे.
दोन महिन्यापूर्वी देशावर कोरोनाचे संकट आल्याने पंतप्रधानांनी संपूर्ण देश लॉकडाऊन घोषित केला. यापूर्वीच शेतकर्यांच्या कापसाची शेवटची वेचणी होऊन संपूर्ण कापूस घरात आला होता. भाववाढीच्या आशेने आणि एकदाच संपूर्ण कापूस विक्री करण्याच्या विचाराने अनेक शेतकर्यांनी सर्व कापूस घरातच साठवून ठेवला होता. एवढ्यात लॉकडाऊन घोषित झाल्याने घरात साठवून ठेवलेला संपूर्ण कापूस विक्रीअभावी घरातच पडून राहिला आहे. पंधरा दिवसापूर्वी शासनाने कापूस खरेदीसाठी काहीअंशी सूट देऊन कापूस खरेदी सुरु केली होती. सुरवातीला एकाच जिनिंगवर दररोज केवळ 20 शेतकर्यांना परवानगी दिल्याने धीम्यागतीने खरेदी सुरु होती. माजलगाव तालुक्यात कापूस विक्री करणार्या 4 हजार 200 शेतकर्यांची नोंद बाजार समितीकडे नोंदविण्यात आली आहे. दररोज केवळ 20 शेतकर्यांचीच मापे होऊ लागल्याने मोठा उशीर होत असल्याने पुन्हा शासनाने यात आणखी 30 शेतकर्यांची वाढ करत दररोज 50 शेतकर्यांना परवानगी देण्याचे आदेश काढले होते. पावसाळा तोंडावर आल्याने खरीप पेरणीची तयारी करण्यासाठी शेतकर्यांकडे पैसे उपलब्ध नाहीत.
घरात पडलेल्या कापसाचीही विक्री होत नसल्याने पेरणीच्या पैस्याची चिंता लागली होती. यामुळे शेतकर्यांच्या मदतीसाठी मतदारसंघातील दोन दिग्गज नेते पुढे सरसावले अन त्यांनी प्रशासनाला निवेदान देऊन पावसाळ्यापूर्वी सर्व कापसाची खरेदी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर चार दिवसापूर्वी दोन्ही नेत्यांनी माध्यमांना बातम्या देऊन बुधवारी पासून मतदारसंघातील सहा नवीन जिनिंग सुरु होणार असून लवकरच शेतकर्यांच्या सर्व कापसाची खरेदी करण्यात येणार असल्याचे आमदार सोळंके, रमेश आडसकर यांनी सांगितले होते. बुधवारी मात्र प्रत्यक्षात पूर्वीचीच एकाच जिनिंग खरेदी सुरु होती. नवीन एकही जिनिंग चालू झाली नाही. नेत्यांनी दिलेल्या बात्म्यामुळे शेतकर्यांनी कापूस विक्रीची तयारी केली होती; परंतु नेत्यांची आश्वासने फुसका बार ठरल्याने भ्रमनिरास झाला आहे. माध्यमांना बातम्या देऊन श्रेय घाण्याचाच नेत्यांचा हा स्टंट तर नव्हताना असा प्रश निर्माण होत आहे.
गे्रडर क्वॉरंटाईनमुळे जिनिंग बंद-आ.सोळंके
याबाबत आ.प्रकाश सोळंके म्हणाले, ट्रेनिंग घेऊन आलेले ग्रेडर यांना जिल्हा प्रशासनाने क्वारंटाईनमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतल्याने बुधवारी जिनिंग सुरु होऊ शकल्या नाहीत.
तर आंदोलन करु-आडसकर
ग्रेडर रेड झोनमधून आल्याने त्यांना तत्काळ जिनिंगवर पाठवणे योग्य नसल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे त्यामुळे जिनिंग सुरु झाल्या नाहीत. दोन दिवसात निर्णय न झाल्यास आंदोलन करणार असल्याचा इशारा भाजप नेते रमेश आडसकर यांनी दिली.
केवळ एकच जिनिंग सुरु-सवणे
नवीन जिनिंग चालू करण्याबाबत आजपर्यंत शासनाचे कोणतेही पत्र प्राप्त न झाल्याने बुधवारी केवळ एकच जिनिंग सुरु ठेवण्यात आली आहे अशी माहिती बाजार समिती सचिव हरिभाऊ सवने यांनी दिली.
Leave a comment