कंटेनमेंट झोनमधील गावाला भेट दिल्याने कारवाई
आष्टी-बीड । वार्ताहर
आृष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे दोन दिवसांपूर्वी सात जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर हे गाव सील करण्यात आले. कंटेनमेंट झोनमधील या गावाला सोमवारी (दि.18) आ. सुरेश धस यांनी भेट दिली. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. दरम्यान, यापूर्वीही नगर जिल्ह्यातून ऊसतोड मजुरांच्या भेटीसाठी गेल्याने त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.
नगर जिल्ह्यातील पिंपळगाव येथील मूळ रहिवासी असलेले एक कुटुंब नवी मुंबईत स्थायिक आहे. तेथून ते सुनेच्या गावी आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे ऑनलाईन परवाना घेऊन आले होते. मात्र, ते हॉटस्पॉटमधून आल्याने त्यांना कोरोनाची लक्षणे आढळली. त्यानंतर ते जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. सातही जणांचे स्वॅब पॉझिटिव्ह आले. त्यानंतर सोमवारी पहाटेच त्यापैकी एका 65 वर्षीय बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर सकाळी आ. सुरेश धस हे सांगवी पाटण गावात गेले, त्यांनी गावकर्यांशी संवादही साधला. कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर सांगवी पाटणसह परिसरातील गावे कंटेनमेंट झोन व बफर झोन जाहीर करुन तेथे इतरांना प्रवेश नाकारला होता. अशा ठिकाणी जाणे नियमबाह्य असतानाही सुरेश धस हे तेथे गेले व ग्रामस्थांशी चर्चा केल्याने त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला.
गुन्हे शाखेकडून प्रतिबंधात्मक कारवाई
दरम्यान, यापूर्वी सीमाबंदी आदेश डावलून आ. धस यांनी नगर जिल्ह्यात प्रवेश करुन ऊसतोड मजुरांची भेट घेतली होती, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला होता. आता कंटेनमेंट झोन गावाला भेट दिल्याने त्यांच्यावर दुसरा गुन्हा नोंद करण्यात आला. सलग दोन गुन्हे नोंद झाल्याने आ. धस यांच्यावर मंगळवारी (दि.19) पोलीस अधीक्षक कार्यालयातील स्थानिक गुन्हे शाखेत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
माझ्याविरुध्द वारंवार कोण गुन्हे
दाखल करतयं पहावं लागेल-आ.धस
लोकप्रतिनिधी म्हणून मी सांगवी पाटण गावाला भेट दिली. तेथील ग्रामस्थ भयभीत होते, त्यांच्याशी सोशल डिस्टन्स ठेवून संवाद साधत धीर दिला. माझ्यावर यापूर्वीही नगर जिल्ह्यात जाऊन ऊसतोड मजुरांना दिलासा दिल्याने गुन्हा नोंद केला होता. प्रशासनाकडून माझ्यावर वारंवार गुन्हे कोण दाखल करायला लावत आहे, हे पहावे लागेल, अशी प्रतिक्रिया आ. सुरेश धस यांनी दिली. शासनाने लोकप्रतिनिधींसाठी काही धोरणच आखले नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या कारवायांना सामोरे जावे लागत आहे. मुंबई, पुण्याहून लोक थेट बीडच्या सीमेपर्यंत येत आहेत, यावरुन शासनाचा कारभार कसा सुरु आहे, हे स्पष्ट होते. शासनाच्या अशा धोरणाचाच फटका सामान्यांना बसत असल्याचा आरोप धस यांनी केला.
Leave a comment