73 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह; दोन बाधित कवडगावथडीचे राहिवासी
एकुण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 11 वर
बीड । वार्ताहर
जिल्हा सामान्य रुग्णालयातून एकूण 77 जणांचे स्वॅब तपासणीला प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यातील 2 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने बीड जिल्ह्याला तिसर्या दिवशी मोठा धक्का बसला आहे. तर 73 रिपोर्ट निगेटिव्ह आले असून अन्य दोघांचे स्वॅब पुन्हा 48 तासानंतर तपासणीला पाठवण्यात येणार आहेत. लातूर येथील स्व.विलासराव देशमुख विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान सोमवारी बाधित रिपोर्ट आलेले दोन्ही रुग्ण माजलगाव तालुक्यातील कवडगाव थडी येथील राहिवासी असून एकाचे वय 65 तर दुसर्या रुग्णाचे वय 18 असल्याचे सांगण्यात आले.
सोमवारी सकाळी जिल्ह्यातून एकुण 77 जणांचे स्वॅब तपासणीला पाठवण्यात आले होते. यात हिवरा येथील कोरोना बाधिताच्या संपर्कातील 42 ते इटकूर येथील बाधित मुलीच्या संपर्कातील 8 असे 50 तर बीडमधून इतर 11, अंबाजोगाईत 15 आणि परळीत 1 असे 27 व हे सर्व मिळून 77 स्वॅब तपासणीला पाठवण्यात आले होते. यातील 73 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून यात अंबाजोगाईचे सर्व 15 ही रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आले आहेत. दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. बीड जिल्ह्यात आजपर्यंतचे एकूण 510 स्वॅब तपासले गेले, यातील 499 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून आता जिल्ह्यात सापडलेल्या एकुण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 11 वर पोहचली आहे. यातील नगर जिल्ह्यातील एका बाधित महिलेचा सोमवारी मृत्यू झाला आहे.
दोघांचे स्वॅब पुन्हा घेणार
सुत्रांच्या माहितीनुसार, कवडगाव थडी येथील एका कुटूंबातील दोघांचे रिपोर्ट सोमवारी पॉझिटिव्ह आले आहेत. ते मुंबईतून 11 मे रोजी मुंबईहून गावी आले होते.
कंटेटमेन्ट झोनमध्ये सर्वेक्षण सुरु
इटकुर (ता.गेवराई) येथील कंटेन्मेंट झोनमध्ये 07 गावांचा समावेश असून 1275 घरामध्ये 4740 सर्व्हे 14 टीममार्फत करण्यात आला आहे. तसेच हिवरा (ता.माजलगाव) येथील कंटेन्मेंट झोन मध्ये 05 गावांचा समावेश असून 818 घरामध्ये 3397 लोकांचा सर्व्हे 7 टीम मार्फत करण्यात आला तर पाटण सांगवी (ता.आष्टी) येथील कंटेन्मेंट झोन मध्ये 5 गावांचा समावेश असून 1276 घरामध्ये 13 टीममार्फत 6 हजार 271 लोकांचा सर्व्हे करण्यात आला आहे. दरम्यान परजिल्ह्यातून आलेले व होम क्वारंटाईन असलेल्या व्यक्तींची संख्या 214 असून 23 जण संस्थात्मक अलगीकरणात असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिशन पवार यांनी दिली.
Leave a comment