मुंबई । वार्ताहर
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. उद्धव ठाकरे यांच्यासह नऊ नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी विधानभवनात पार पडला. सभापती रामराजे निंबाळकर यांनी दुपारी एक वाजता उद्धव ठाकरे यांना शपथ दिली. उद्धव ठाकरेंची विधिमंडळाच्या सदस्यपदी वर्णी लागल्यामुळे गेल्या काही आठवड्यांपासून राज्यावर घोंगावणारे राजकीय संकट दूर झाले आहे.
शपथविधीसाठी उद्धव ठाकरे यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित होते. याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री अनिल देशमुख, मंत्री बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, शिवसेना खासदार अरविंद सावंत, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.
भाजपचे रणजितसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके आणि रमेश कराड यांनी विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. तर उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे यांना विधानपरिषदेची शपथ देण्यात आली. काँग्रेस कडून राजेश राठोड, तर राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांनी शपथ घेतली.
कोणकोणत्या आमदारांचा शपथविधी
उद्धव ठाकरे - शिवसेना
निलम गोऱ्हे - शिवसेना
राजेश राठोड - काँग्रेस
शशिकांत शिंदे - राष्ट्रवादी
अमोल मिटकरी - राष्ट्रवादी
रणजितसिंह मोहिते पाटील - भाजप
गोपीचंद पडळकर - भाजप
प्रवीण दटके - भाजप
रमेश कराड - भाजप
Leave a comment