नवी दिल्ली:
सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू असताना कोरोना संकट आल्याने काही विषयांच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत. मात्र, आता या उर्वरित विषयांच्या परीक्षा होणार आहेत. सीबीएसई बोर्डाने दहावी आणि बारावीच्या उर्वरित विषयांच्या परीक्षांचे वेळापत्रक शनिवारी (१६ मे २०२०) रोजी जाहीर करण्याचं म्हटलं होतं. मात्र, आता वेळापत्रक जाहीर करण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशांक यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांच्या वेळापत्रकाला अंतिम रूप देण्यापूर्वी काही अतिरिक्त तांत्रिक बाबी विचारात घेत आहे, त्यामुळे आज संध्याकाळी पाच वाजता जाहीर होणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक आता सोमवारी (१८ मे २०२०) रोजी जाहीर करण्यात येईल.
सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या उर्वरित विषयांच्या परीक्षांचे वेळापत्रक संध्याकाळी जाहीर करण्यात येईल असं ट्वीट केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशांक यांनी शनिवारी सकाळी केलं होतं. परीक्षेच्या संदर्भात मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरिाल निशांक यांनी ट्वीट करत म्हटलं होतं की, कोरोनाच्या संकटामुळे सीबीएसई बोर्डाच्या उर्वरित विषयांच्या परीक्षांबाबत अनिश्चितता होती. पण आज ही अनिश्चिततता दूर करुन परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करत आहोत. त्यानंतर आता वेळापत्रक जाहीर करण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशांक यांनी गेल्या आठवड्यातच ट्वीट करत माहिती दिली होती की, सीबीएसई बोर्डाच्या उर्वरित विषयांच्या परीक्षा १ जुलै २०२० ते १५ जुलै २०२० या कालावधीत होतील.
दहावीच्या परीक्षा केवळ ईशान्य दिल्लीतील शाळांमध्ये होणार आहेत तर देशातील इतर भागात १०वीच्या उर्वरित विषयांच्या परीक्षा घेतल्या जाणार नाहीयेत. तर १२वीच्या उर्वरित विषयांच्या परीक्षा संपूर्ण देशभरात होतील.
Leave a comment