बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्याच्या मदतीला पुन्हा एकदा बारामती धावून आली असून जामखेडचे आमदार रोहितदादा पवार यांच्या बारामती ऍग्रो मार्फत जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेला 600 लिटर सॅनिटायझर मोफत देण्यात आले आहे.जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत आ. रोहित पवारांकडे विनंती केली होती.
सोमवारी बारामती ऍग्रोच्या वतीने बीड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्याकडे हे 600 लिटर सॅनिटायझर सुपूर्द करण्यात आले. त्यानंतर ना. मुंडे यांनी आ.रोहित पवार व समस्त पवार कुटुंबियांचे आभार मानले आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र सध्या सॅनिटायझर्स चा तुटवडा आहे. याचा विचार करून बारामती ऍग्रो समूह पुढे येऊन सॅनिटायझर निर्मिती करत आहेत.याबाबत माहिती मिळताच बीड जिल्ह्यातील सॅनिटायझरची निकड लक्षात घेता मुंडेंनी बारामती ऍग्रो कडून बीड जिल्हा आरोग्य यंत्रणेला सॅनिटायझर देण्याबाबत आ. रोहित पवारांकडे विनंती केली होती. या विनंतीला आ. पवारांनी लागलीच सकारात्मक प्रतिसाद दिला.मागील वर्षीच्या भीषण दुष्काळातही आ. रोहित पवारांनी बारामती ऍग्रोच्या वतीने जिल्ह्यात टँकर द्वारे मोफत पाणी पुरवठा केला होता. दुष्काळ किंवा विविध संकट काळात बारामती नेहमीच बीड जिल्ह्याच्या मदतीला धावून आलेली आहे. खा. शरद पवार,अजित पवार यांच्यापाठोपाठ आता पुढच्या पिढीतील आ. रोहित पवार यांनीही ही परंपरा कायम राखली असून त्यांचे बीड जिल्हा वासीयांच्या वतीने आभार मानतो, अशा शब्दात बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आ. रोहित पवार यांचे आभार मानले आहेत.
Leave a comment